नांदेड| तमाम हिंदुस्थानाचे प्रेरणा स्थान असणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या भव्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या राजमाता जिजाऊ सृष्टीचे लोकार्पण नांदेड येथे नुकतेच महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. ना.एकनाथरावजी शिंदे साहेब व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते झाले आहे. येत्या ११ व १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ सृष्टी येथे दोन दिवसीय सामाजिक,प्रबोधनात्मक व सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या स्वराज्यप्रेरिका, माँसाहेब जिजाऊ यांची १२ जानेवारी रोजी जयंती तमाम महाराष्ट्रभर विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी केली जाते. त्याचप्रमाणे नांदेड येथे उभारलेल्या व नुकतेच लोकार्पण झालेल्या राजमाता जिजाऊ सृष्टी, जानकी नगर, हनुमान गढ येथे दि.११ व १२ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ११ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ५ वा.प्रा डॉ. शिवराज शिंदे यांचा समाज प्रबोधनपर क्रांतिकारी शाहिरी जलसा व रात्री दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ०९ वा.विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शोभायात्रेत ऐतिहासिक देखाव्यांसहीत ढोलताशा पथक, घोडे, ऐतिहासिक पात्र, सुसज्ज लेझीम, वारकरी संप्रदायाचा सहभाग यांसह, पालखी मिरवणूकीचेही आयोजन करण्यात आले आहे. व १२ जानेवारी रोजी दिवसभर भव्य रक्तदान व आरोग्य शिबीर यांसह अभिवादनाचा सोहळा सुरू राहील. या दोन दिवसीय सामाजिक व प्रबोधनात्मक सोहळ्यात आपण सर्वांनी सहकुटुंब सहभागी व्हावे असे आवाहन राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी केले आहे.