हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसात देखील नागरिकांना मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने अंधाराचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे किरकोळ अपघात आणि चोरीच्या घटना वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हि बाब लक्षात घेता तात्काळ मुख्याधिकारी यांनी हिमायतनगरातील मुख्य प्रवेश कमान ते श्री परमेश्वर मंदिर रस्त्यासह शहरातील रस्त्यावरील स्ट्रिट लाईट चालू करावि अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण डांगे यांची निवेदनाद्वारे केली आहे.


मागील एक महिन्यापासून हिमायतनगर शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यावरील स्ट्रिट लाईट खांबावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिक, वाटसरूंना रात्री बे रात्री अंधाराचा नाहक त्रास होत आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या खांबामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या खांबावर मोठ्या प्रमाणात बैनर लावले जात असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना ते लागून चालकाचा तोल जात आहे. से असताना शहरातील या समस्येकडे नगरपंचायतचे संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत.


अश्याच प्रकारामुळे मागील काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर काही चौरट्यांनी अंधाराचा फायदा घेत तीन दुकाने फोडल्याची घटना घडली होती. तसेच अनेकजण अंधारामुळे पडून जखमी झाले होते. असेच प्रकार येणान्या काळात घडून नयेत म्हणून नगर पंचायतच्या मुख्याधिकारी यांनी तात्काळ नागरिकांच्या समस्येची दखल घेऊन श्री परमेश्वर मंदिर कमान ते मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावरील सर्व स्ट्रिट लाईट व शहरातील मुख्य रस्त्यावरील पथदिवे चालू करून नागरिकांची, विद्याथी व वाहनधारकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण डांगे यांनी निवेदन देऊन केली आहे.
