नांदेड। ड्रोन कॅमेराचा वापर उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, नगरपरिषद येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना करता यावा यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून आज 9 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ड्रोन कॅमेरा हाताळणीसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते.जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी या प्रशिक्षणाचे दोन सत्रात नियोजन केले होते.


प्रशिक्षणात पहिल्या सत्रात पिपीटीद्वारे ड्रोन कॅमेऱ्याची ओळख, उपयोग आवश्यकता व प्रश्न-उत्तरे घेण्यात आली. तर दुसऱ्या सत्रात आरपीटेक कं.चे प्रशिक्षक एस.जोशी प्रशांत ,पि.सुनके यांनी प्रत्यक्ष ड्रोन कॅमेरा हाताळणीचे प्रशिक्षण दिले.

आपत्कालीन परिस्थीतीत झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्यासाठी तसेच शोध व बचाव कार्यासाठी ड्रोन कॅमेराद्वारे सात तालुक्यातील अतिवृष्टीमुळे पुराने बाधीत गावांचे प्राथमिक सर्वेक्षण जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केले होते. तो अनुभव पाहता ड्रोन कॅमेराद्वारे अशा परिस्थितीचे प्राथमिक सर्वेक्षण करणे उपयोगी पडत असल्याचे दिसून येते. तसेच मान्सुन 2025 पुर्व तयारी आढावा बैठकीत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांनी आपत्कालीन परिस्थीती झालेल्या नुकसानीबाबत प्राथमिक अंदाज घेण्यासाठी तसेच शोध व बचाव कार्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर करावा असे निर्देश दिले होते. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तसा वापर केला गेला असल्याने नांदेड जिल्हा प्रशासनाची नोंद घेतली आहे.

या प्रशिक्षणास नांदेड जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, नगरपरिषद येथील अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. या ड्रोन कॅमेरा प्रशिक्षणास स्वतः जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अनन्या रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे म.स.बारकुजी मोरे, सहा.गौरव तिवारी, असि.कोमल नागरगोजे सह पोलिस विभाग, नांदेड जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, नगरपरिषद व पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी यांनी सदर प्रात्याक्षिक सराव प्रशिक्षणात सक्रिय सहभाग घेतला.
