हिमायतनगर,अनिल मादसवार। शहर व तालुका परिसरात सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारापासून चक्रीवादळ सदृश्य वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, यामुळे सर्वसामान्य नागरिकांची एकच धावपळ झाली असून, अनेकांच्या घरावर टिनपत्रे उडून गेली आहेत, तर शेकडो झाडे जमीनदोस्त झाली असून, वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक धास्तावले आहेत.


एकूणच मृग नक्षत्र लागल्याच्या दिवसापासून सायंकाळी वादळी वारे विजांचा कडकडाट, पावसाची धुंवाधार, चक्रीवादळा सारख्या परिस्थितीमुळे अनेकांच्या उरात धडकी भरली होती असे चित्र तासाभरापासून सुरू आहे, 7 वाजता सुरू झालेल्या वादळी वारे व विजांचा कडकडात सुरू असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

हिमायतनगर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मृगाचा पाऊस वेळेवर होणार असल्याने शेतातील आखाड्यावर खत, बी बियाणे नेऊन पेरणीची पूर्वतयारी केली आहे, मात्र आजच्या प्रचंड वादळी वारे व विजांच्या कडकडाट सह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या बियाण्यासह वैरण भिजून मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज सायंकाळी सुरू झालेल्या चक्रीवादळच्या तडाख्यात शहरातील दत्तनगर परिसरातील नागरिक श्याम ठाकरे यांच्या घरावर बांधण्यात आलेली डिझाईन भिंत, पॅरापिट वॉल कोसळली असून, सुदैवाने यावेळी रस्त्यावर कोणीही नव्हते, अन्यथा मोठी हानी झाली असती. मात्र ही भिंत कोसळल्याने ठाकरे यांचे मोठे नुकसान झाले असून, अनेकांच्या घरांची पडझड देखील झाली आहे, अचानक आलेल्या वादळी पावसाच्या घरपडी, टिन पत्रे उडून गेलेल्या नागरिक, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.