हिमायतनगर| तालुक्यातील सवना ज. जिरोणा, रमणवाडी, गणेशवाडी, महादापुर, दगडवाडी, चिचोर्डी, एकघरी, वाशी, पार्डी ज, पिछोडी भागाला जोडणाऱ्या पाचशिव महादेव फाटा येथील श्री पार्श्वनाथ महादेव मंदिराच्या यात्रे निमित्ताने सोमवारी हजारो भाविक भक्तानी उपस्थित होऊन दर्शनासाठी गर्दी केली होती.
प्रतिवर्षीच्या परंपरेनुसार जानेवारी महिन्यांतील पहिल्या सोमवारी पार्श्वनाथ मंदिराची यात्रा भरविली जाते. यंदा हि यात्रेला दिनांक ०५ पासून सुरुवात झाली असून, यात्रेत सोमवारच्या दिवशी हजारो भाविकांनी उपस्थिती लावून भगवान पार्श्वनाथ महादेवाचे दर्शन घेतले. तसेच मंदिरातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रसादाचा लाभ महिला- पुरुष नागरिकांनी घेतला. यात्रेमध्ये थाटण्यात आलेल्या विविध प्रकारच्या दुकानावर साहित्य खरेदीसाठी महिला पुरुषांनी गर्दी केली होती.
यात्रा भरविल्या जाणाऱ्या परिसरात अठरा पगड जातीचे लोक एकत्र येऊन हा यात्रा उत्सव साजरा करतात, यात्रेत खास करून बंजारा समाजातील महीलांचे आकर्षण असलेले साहित्य देखील विक्रीसाठी दाखल झाले असल्याचे पाहावयास मिळाले आहे. एकूणच हि यात्रा तीन दिवस चालणारी असून, यात्रेचा आनंद लुटन्यासाठी चिमुकल्याना घोडागाडी, आकाश पाळणे, यासह विविध खेळणी साहित्य आणि मिठाईसह जिलेबी, भजे आदी खाद्य पदार्थानी लक्ष वेधून घेतले होते.
यात्रा कमिटीच्या वतीने यात्रा काळात सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा यासह भव्य पशुप्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, या स्पर्धामध्ये शेतकरी, नागरिक, शालेय विद्यार्थी सहभागी होणार असून, विजेत्यांना बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असल्याचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी सांगितले आहे. वर्षातून एकवेळ येणाऱ्या यात्रा उत्सवामुळे परिसरातील ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण दिसून आले आहे.