किनवट, परमेश्वर पेशवे| आपल्या समस्या व्याधी घेऊन देवरूपी डॉक्टरांकडे या शिबिरात आपण आलो आहोत. तेव्हा व्यवस्थित तपासणी करून घ्या डॉक्टरांना सहकार्य करा. आदिवासी भागातील गोर-गरीब रुग्णांसाठी हे महाआरोग्य शिबिर वरदान आहे. असे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी केले.
येथील उपजिल्हा रुग्णालयात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आदिवासी भागातील भव्य व मोफत वैद्यकीय व दंतचिकित्सा शस्त्रक्रिया महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर , निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे , डॉ. साखरे, डॉ. अंजली पाटील , रुग्ण कल्याण समितीचे सदस्य पत्रकार गोकुळ भवरे , अखिल खान अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष प्रमोद पोहरकर, ग्रामपंचायत सदस्य संजय सिडाम आदींची मंचावर उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व धन्वंतरी पूजन झाल्यानंतर विविध स्टॉलचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. उत्तम कानिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड यांनी आभार मानले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर असे म्हणाले की , मी कधी पंढरीच्या वारीला गेलो नाही , परंतु या महारोग्य शिबीरासाठी मी तत्परतेने येतो. गोर गरीब रुग्णांच्या कल्याणासाठी असलेलं हे शिबीरच माझ्यासाठी पंढरीची वारी आहे. जिल्हा मुख्यालयापासून दिडशे किमी अंतरावर असलेला हा तालुका आहे. त्यामुळे इकडे माझं विशेष लक्ष आहे. आम्ही येथे अधिकच्या आरोग्य सुविधा नवनवीन यंत्राच्या माध्यमातून पुरविल्या आहेत. वैद्यकीय अधिक्षक डॉ. दत्ता केंद्रे यांच्या नेतृत्वात येथील वैद्यकीय अधिकारी चांगल्या सुविधा देत आहेत. तसेच डॉ. मनोज घडसिंग , डॉ. सुनंदा भालेराव हे येथे डायलेसिस युनिट , 2 डी डॉप्लर तपासणी यंत्र याचा पुरेपूर लाभ रुग्णांना देत आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो , असेही गौरवोद्गार त्यांनी काढले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुनंदा भालेराव , डॉ. एहसान जुबेरी, डॉ. मनोज घडसिंग , डॉ. व्ही. टी. साठे , डॉ. स्वाती केंद्रे , डॉ. गुंटापेल्लीवार , डॉ. गायकवाड , डॉ. अश्विन , डॉ. राठोड , डॉ. ओव्हळ आदींसह , परिचारिका सर्व वैद्यकीय कर्मचारी वृंद परिश्रम घेत आहेत. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप वाकोडीकर , व्हाईस ऑफ मीडियाचे उपाध्यक्ष विवेक ओंकार , परविन बेगम , बबन वानखेडे , सतिश घुले आदिंची उपस्थिती होती.