नांदेड| सीटू कामगार संघटनेने मनपाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात पूरग्रस्तांचे अर्ज जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाने व तहसीलदार यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या आदेशानुसार सादर केले आहेत. परंतु अत्यंत मुजोर असलेल्या मनपाच्या कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बेशिस्तिचे दर्शन या वर्षी देखील घडविले.
झोन क्रमांक चार च्या लिपिकांनी अर्ज घेणार नाही अशी भूमिका घेतली ती बेकायदेशीर होती. त्या संदर्भात क्षेत्रीय अधिकारी श्री संजय जाधव यांच्याकडे सीटू च्या शिष्टमंडळाने अर्ज स्वीकारण्यात याव्यात अशी विनंती केली. त्या संदर्भाने श्री जाधव यांनी योग्य कार्यवाही करणे अपेक्षित होते परंतु तसे न करता आवक जावक लिपिक व इतर उद्धटपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समर्थन केले.
मनपाच्या सर्वच झोनच्या लिपिकांनी कमी अधिक प्रमाणात कायद्याची पायमल्ली केली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. बोगस पूरग्रस्तांची यादी व पंचनामे करण्याऱ्या सर्व वसुली लिपिक व तलाठ्यावर निलंबनाची कारवाई करावी. खऱ्या पूरग्रस्तांना अनुदान वाटप करावे. श्री संजय जाधव यांची पदोन्नती रद्द करावी या मागणीसाठी जमसं व सीटू संलग्न मजदूर युनियनचे मनपा समोर साखळी उपोषण सुरु असून ९ डिसेंबर रोजी मनपा आयुक्त यांना शकडो कामगारांनी घेराव घातला आहे.
तेव्हा महापालिका आस्थापना विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या स्वाक्षरीने संघटनेचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड आणि सरचिटणीस कॉ.उज्वला पडलवार यांच्या नावे लेखी पत्र देऊन कळविण्यात आले की, श्री संजय जाधव यांना सद्यस्थितीत कोणत्याही पदावर पदोन्नती दिलेली नाही. त्यांना प्रशासकीय कारणास्तव प्रभारी उप आयुक्त पदाचा पदभार दिला आहे. श्री जाधव यांची पदोन्नती सीटूच्या दणक्याने रद्द झाली असून त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात यावा अशी प्रतिक्रिया कॉ. गायकवाड यांनी दिली आहे.