नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील गणितीयशास्त्र संकुलातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या सांख्यिकी अधिकारी (वर्ग-२) स्पर्धा परीक्षेमध्ये संकुलातील अतिश तानगावडे, अजय कदम व अफझल शेख यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
सध्याच्या घडीला बरेच तरुण-तरुणी शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतात. यासाठी विद्यार्थी देखील अहोरात्र मेहनत घेत असतात. प्रसंगी काहींना यश मिळते तर काहींच्या पदरी निराशा पडते. पण दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर डोंगराएवढ्या संकटाला भेदून यशाला गवसणी घालणं शक्य होते. याचेच एक उदाहरण म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या गणितीयशास्त्रे संकुलातील विद्यार्थी अतिश तानगावडे, अजय कदम व अफझल शेख यांनी घवघवीत यश संपादन करून एमपीएससी मार्फत सांख्यिकी अधिकारी (वर्ग-२) पदी निवड झालेली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे अतिश तानगावडे याने सदर परीक्षेत राज्यातून मुलांमधून प्रथम क्रमांक पटकावला आहे. यापूर्वीही संकुलातील अनॆक विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेसमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या सांख्यिकी अन्वेषक पदावर आरोग्य खात्यातील सांख्यिकी अधिकारी, बहुवीध राष्ट्रीयकृत बँकामध्ये व तसेच नामांकित मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये उच्चपदावर कार्यरत आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ला अनुसरून अलीकडेच गणितीयशास्त्रे संकुलातील अभ्यासक्रम अद्ययावत करण्यात आलेले आहे. त्यामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग, संशोधन प्रकल्प तसेच विविध सॉफ्टवेअर सर्टिफिकेट कोर्सेस आदींचा समावेश असल्याने भविष्यातही अशा प्रकारच्या नानाविध रोजगाराच्या संधींची कवाडे विद्यार्थ्यांसाठी निश्चितच खुली होणार आहेत. असा आशावादही विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी या प्रसंगी व्यक्त केला आहे.
त्यांच्या या यशाच्या प्रवासात संकुलाचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर पवार, संख्याशास्त्र विषयाचे सहयोगी प्रा. डॉ. अनिकेत मुळे, डॉ. रुपाली जैन, डॉ. नितीन दारकुंडे, डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, डॉ. उषा सांगळे, उदय दिव्यवीर ह्यांचे मोलाचे योगदान आहे. सर्व स्तरावरून सांख्यिकी अधिकारी पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. माधव पाटील, कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यापीठाच्या यशाच्या परंपरेत आणखी तीन मानाचे तुरे खोवल्याबद्दल गणितीयशास्त्रे संकुलाच्या सर्व शिक्षकांच विशेष अभिनंदन केले आहे.