नांदेड| येथील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. जगदीश कदम यांना मराठी साहित्यातील महत्वपूर्ण योगदाना बद्दल महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य म्हणून संधी देण्यात यावी, अशा मागणीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. येथील सप्तरंगी साहित्य मंडळाचे चौथे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन सप्तरंगी साहित्य मंडळ आणि प्रज्ञादर्शन शिक्षण संस्था मुदखेड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच संपन्न झाले. या संमेलनाच्या समारोप सत्रात एकूण सोळा ठराव मंजूर करण्यात आले.


या ठरावांचे वाचन सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष प्रविणदादा गायकवाड, निमंत्रक प्रल्हाद हिंगोले, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे उपाध्यक्ष पांडुरंग कोकुलवार, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, राज्य सचिव कैलास धुतराज, कोषाध्यक्ष शंकर गच्चे, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, महिला विभाग प्रमुख रुपाली वागरे वैद्य, दत्ताहरी कदम, प्रकाश ढवळे नागलगांवकर, बी. जी. कळसे, गौतम कांबळे आदींची उपस्थिती होती.

चौथ्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद डॉ. जगदीश कदम यांनी भुषविले. या निमित्ताने त्यांना विधानपरिषदेवर घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा. तसेच म. फुले आणि सावित्रीमाई फुले यांनीही भारतरत्न पुरस्कार द्यावा, भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर संविधान हा उपक्रम राबवून प्रत्येकाच्या घरी भारतीय संविधान राष्ट्रीय ग्रंथ म्हणून विनामूल्य देण्यात यावे, मराठी मुलखात बोलल्या जाणाऱ्या सर्वच बोलीभाषांना मराठी भाषेने सामावून घ्यावे, ग्रामीण मराठी साहित्य संमेलनास दरवर्षी विनाअट अनुदान मंजूर करण्यात यावे, नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीने ग्रामीण साहित्य संमेलनाला निधी उपलब्ध करून द्यावा, ग्रामीण भागातील साहित्य चळवळ आणि साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्याची साहित्य अकादमीने दाखल घ्यावी, वयोवृद्ध साहित्यिक, कलावंत याना विना अट रु. १०,००० मानधन द्यावे, बोली भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी काही नवीन प्रकल्प हाती घ्यावेत.

तसेच जिल्हा परिषद तथा मनपाच्या धर्तीवर जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी ग्रंथोत्सव भरविण्यात यावा, ग्रामीण भागातील माध्यमिक, उच्च माध्यमिक तथा पदवी महाविद्यालयांना साहित्य संमेलने भरविण्यास शासनाने उत्तेजन द्यावे, शेती मालाला हमी भाव जाहीर करावा आणि तो चार महिन्याच्या आत खरेदी करण्याची व्यवस्था करावी, सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सामावून घेऊन प्रस्तावित नवीन जिल्ह्यांची व तालुक्यांची निर्मिती करावी, शक्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात पण कोणत्याही परिस्थितीत मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत, न्यायालयासह सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामकाज मराठीतूनच व्हायला हवे. दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक पत्रकार बबन कांबळे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्यात यावा असे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
