नांदेड| सरंजामी, जुलमी व्यवस्था कायम आपण अनुभवतो आहोत पण या बलाढ्य व्यवस्थेच्या विरोधात खंबीरपणे उभे राहून अन्यायी व्यवस्था उलटून टाकण्यासाठी फार मोठी ताकद लागत नाही तर संग्राम बोईनवाड सारखा ‘आयास’ कादंबरीतील नायक पुरेसे आहे. म्हणून आयास कादंबरी आपणास या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी प्रेरणा देते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक- समीक्षक डॉ. अनंत राऊत यांनी केले.
बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ बिजूर व ड्रीम फिटनेस स्टुडिओ भाग्यनगर, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संवाद पुस्तकांशी अन् गप्पा लेखकांशी’ या उपक्रमांतर्गत “आयास” कादंबरीवर चर्चा व “आयास” कादंबरीचे लेखक डॉ. शंकर विभुते यांची प्रकट मुलाखत ड्रीम फिटनेस स्टुडिओ येथे आयोजित करण्यात आलेली होती. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात डॉ. राऊत बोलत होते.
लेखक डॉ शंकर विभुते यांची मुलाखत घेताना पत्रकार भारत दाढेल यांनी अनेक महत्त्वाची प्रश्न विचारून लेखकाच्या साहित्य लेखनाचा इतिहास सभागृहात उलघडून दाखवला. मुलाखत देताना डॉ. शंकर विभुते म्हणाले की, आपणास मिळालेल्या मर्यादित आयुष्यात जीवनातील सगळीच अनुभूती आपण घेऊ शकत नाही पण कथा, कादंबरी, ललित साहित्य वाचून ही अनुभूती आपण घेऊ शकतो. माझ्या साहित्यातील नायकांची नावे काल्पनिक असली तरी ती नात्यातील, कुटुंबातील आणि परिसरातील वास्तव माणसे आहेत.
‘आयास’ कादंबरी बद्दल डॉ नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. सूर्यनारायण रणसुभे, डॉ. वासुदेव मुलाटे, देविदास फुलारी, जगदीश कदम, महेश मोरे यांनी जे गौरवार्थ लेखन केले ते सगळ्यात मोठा पुरस्कार आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ड्रीम फिटनेस स्टुडिओच्या संचालिका रेणुका गुप्ता यांनी दुरभाष्यद्वारे केले. यावेळी स्वच्छता विषयक राष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाल्याबद्दल मिलिंद व्यवहारे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.भगवान सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक डॉ. राम वाघमारे, प्रशांत कऱ्हाळे, डॉ. विजया दाढेल आदिनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ जगदीश कदम, कथाकार दिंगबर कदम, कवी महेश मोरे, शाहीर दिगू तुमवाड, डॉ. हनुमंत भोपाळे, डॉ. मस्के, गटशिक्षणाधिकारी किशन फोले, डॉ. श्रीराम गव्हाणे, प्रा.भगवान अजंनीकर, प्रा. कैलास दाढेल, आनंदी अडकुणे, डॉ. हापगुंडे, डॉ.भोसले, डॉ. ठाकूर, डॉ. कस्तुरे, डॉ. जगदंबे, कलावंत कासेकर, डॉ. नवले अनेक साहित्यिक आणि श्रोतावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रमाच्या शेवटी लेखक डॉ शंकर विभुते यांनी सादर केलेल्या ‘मा. आमदार गणपतराव’ विनोदी कथेने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.