नांदेड| अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला हेलस तर्फे दरवर्षी साने गुरुजी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कथाकथन स्पर्धेत यंदा नांदेडच्या महात्मा फुले हायस्कूलच्या संचिताने विभागीय स्तरावर बाजी मारली आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धा प्रियदर्शिनी विद्या संकुल, नांदेड येथे शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी पद्माकर कुलकर्णी, गट शिक्षणाधिकारी व्यंकट गंदपवाड, बालासाहेब माधसवाड व विलास कोळनुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. स्पर्धेचे परीक्षण प्रवीण राऊत, कविता जोशी व रूपाली गोजवडकर यांनी केले. जिल्हास्तरीय स्पर्धेत संचिता सुभाष अष्टेकरने प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक पद्मावती जाधव तर तृतीय क्रमांक अलिशा शेख यांनी पटकावला.
विभागीय स्तरासाठी बाबानगरच्या महात्मा फुले हायस्कूलची निवड करण्यात आली होती. परभणी येथे पार पडलेल्या विभागीय स्पर्धेत संचिताने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. या यशासाठी संचिताने सातत्याने मेहनत घेतली व शाळेतील शिक्षकांनी तिला योग्य मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम, उपमुख्याध्यापिका ललिता कोलेवाड, पर्यवेक्षक अरुण कल्याणकर, पर्यवेक्षिका ज्योती महाराज व वैशाली देशमुख यांनी संचिताला प्रोत्साहन दिले.
शारदा भवन शिक्षण संस्थेचे सचिव डी. पी. सावंत, सहसचिव रावसाहेब शेंदारकर, खजिनदार अॅड. उदयराज निंबाळकर, संचालक नरेंद्र चव्हाण यांनी संचिताचे कौतुक व अभिनंदन केले आहे. महात्मा फुले हायस्कूलमधील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संचिताच्या यशाचे अभिनंदन केले आहे.