हिमायतनगर, प्रतिनिधी | हिमायतनगर शहर व परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाचा जोर गुरुवारी सकाळपासून वाढल्याने शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मुरवणी पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


यंदाच्या हंगामात अधूनमधून होत असलेल्या हलक्या पावसामुळे पिकांची स्थिती समाधानकारक असली, तरी अपेक्षित वाढ न झाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, सुरू असलेल्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.


मात्र, अद्याप परिसरात एकही मोठा मुसळधार पाऊस झालेला नसल्याने ओढे-नाले कोरडेच आहेत. त्यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यासाठी आणि आगामी पाणीटंचाई टाळण्यासाठी दमदार पावसाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.



हवामान विभागानेही पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकरी वर्गाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सुरू असलेल्या पावसाचे मुसळधार स्वरूपात रूपांतर होऊन जलस्रोत भरावेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा आणि शेतीला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध व्हावा, अशी प्रार्थना शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
गेल्या दोनतिन दिवसापासून या भागात कधी काळाचा अवकाश सोडला तर पावसाची रिपरीप सुरूच आहे. दि. ३० गुरूवारी सकाळपासूनच पावसाचा जोर पहावयास मिळत होता. खरिपाच्या पेरणीतील पिकांना मौसमी पावसाची आवश्यकता असतांना मध्यंतरीच्या काळात काही दिवसाची अखंडपणे उघडीप मिळाली असल्याने खरिपाच्या पेरणीतील पिके पावसाची आस लावून बसली होती. परंतू गेल्या काही दिवसांपासून या भागात मौसमी पावसाला चांगल्या प्रकारे सुरूवात झाली आहे. शुक्रवारी पावसाने सकाळपासूनच जोरदार सुरूवात केली. तालूक्यातील तिन्ही मंडळात जोरदार पाऊस बरसत आहे.
तालूक्यातील सरसम मंडळात ५६ मी.मी. हिमायतनगर वर्तूळात ५६•५ अशी समान पावसाची नोंद झाली असून जवळगाव मंडळात मात्र पावसाची तिव्रता अधिक पट्टीने कमी असल्याचे पाहवयास मिळत असून जवळगाव मंडळात २८•८ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. हिमायतनगर तालूक्यात सरासरी पाऊस ८६७•३० अपेक्षित आहे.तालूक्यात पावसाळ्याच्या सुरूवातीपासून आजतागायत २५५•७०मी.मी. पावसाची नोंद झाली असल्याची माहीती महसूल सह्ह्यायक गोविंद पांपटवार यांनी दिली. तालूक्यात कोसळत असलेला पाऊस खरिपाच्या पेरणीसाठी महत्वपूर्ण ठरत आहे.

