नांदेड,प्रतिनिधी | नांदेड शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्ता मुसळधार पावसामुळे अचानक खचल्याने एक कार थेट सुमारे १० फूट खोल खड्ड्यात कोसळली. कारचे चालक प्रा. चंद्रशेखर येंगडे यांनी प्रसंगावधान राखत चालत्या वाहनातून उडी मारल्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.


दररोज हजारो विद्यार्थी, पालक आणि नागरिक याच मार्गाने ये-जा करतात. अशा ठिकाणी रस्ता खचून एवढा मोठा खड्डा निर्माण होणे हे संबंधित यंत्रणांच्या हलगर्जीपणाचे द्योतक असल्याची तीव्र प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ता गौतम जैन व नागरिकांनी व्यक्त केली आहे.


घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “फी वेळेवर घेतली जाते; पण सुरक्षित रस्त्याची जबाबदारी कोणाची?” असा सवालही गौतम जैन यांनी उपस्थित होत आहे. ४८ तासांत रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी. निष्काळजी अधिकाऱ्यांवर BNS कलम 281 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. नुकसानग्रस्त वाहनधारकाला तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे




“आज कार खड्ड्यात पडली, उद्या एखादा विद्यार्थी किंवा नागरिक बळी गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाई आणि कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली आहे.

