हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यात पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाअभावी हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सोयाबीन, कापूस यासह विविध पिके पाण्याअभावी सुकत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीची शासनाने तातडीने दखल घ्यावी, यासाठी बुधवार, दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता हिमायतनगर तहसील कार्यालयावर शेतकरी पुत्रांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.



‘शेतकरी वाचला तर जग वाचेल!’ या भूमिकेतून आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी पुत्र वामनराव पाटील वडगावकर, कल्याण पाटील वानखेडे पळसपूर यांनी शहर व तालुक्यातील तालुक्यातील शेतकरी संघर्ष समितीच्या एकजुटीने तहसीलवर धडकणार असल्याचे सांगीतलें आहे.



हिमायतनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी – पावसाने ओढ दिल्यामुळे शेतातील पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे हिमायतनगर तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा, तसेच नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी प्रमुख मागणी मोर्चातून करण्यात येणार आहे.



शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाकडून आवश्यक आर्थिक हातभार मिळावा, तसेच विविध दुष्काळी सवलती व मदतीचा लाभ तातडीने मिळावा, अशा मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनामार्फत शासनाला देण्यात येणार आहे.
‘आता शांत बसायचे नाही’ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वारंवार आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदतीची गरज आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एकजूट दाखविण्याचा निर्धार या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. “शेतकरी बांधवांनो, ही वेळ शांत बसण्याची नाही. आपल्या हक्कासाठी आणि आपल्या पिकांच्या भविष्यासाठी ९ सप्टेंबर रोजी हिमायतनगर तहसील कार्यालयावर मोठ्या संख्येने उपस्थित राहा,” असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

