नांदेड, प्रतिनिधी| मराठी चित्रपट सृष्टीसमोरील विविध समस्या सोडवून या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या सांस्कृतिक धोरण-२०२४ची प्रभावी अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी चित्रपट बचाव समिती, नांदेड जिल्ह्याच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी किरण आंबेकर यांना निवेदन देण्यात आले.



मराठी चित्रपट सृष्टीसाठी सांस्कृतिक धोरण-२०२४ जाहीर होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेले शासन निर्णय अद्याप निर्गमित झाले नसल्याने चित्रपट क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि संबंधित घटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.



मराठी चित्रपटसृष्टीला आर्थिक व संस्थात्मक पाठबळ मिळावे, धोरणाची तातडीने अंमलबजावणी व्हावी तसेच चित्रपट क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी चित्रपट दिग्दर्शक स्वप्निल कापसे, चित्रपट दिग्दर्शक महेश अन्नापुरे, सिने अभिनेते भूषण जोशी आणि सिने अभिनेते संजीव स्वामी यांची उपस्थिती होती.




