हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गालगत उंच टेकडीवर असलेल्या सोनारी-पोटा बु. माळावरील महादेव मंदिरात बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरा फोडून त्यातील सिमकार्ड चोरून नेण्यात आले, तर दानपेटी फोडून त्यातील रक्कमही लंपास करण्यात आली. या घटनेमुळे परिसरातील भाविकांमध्ये नाराजी पसरली असून, धार्मिक स्थळेही चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.


महादेवाचे भक्त श्रीनिवास देवराव जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी माळटेकडीजवळील शेतातील जळालेल्या डिपोची वायर काढण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले असता मंदिराजवळील सीसीटीव्ही कॅमेरा फोडल्याचे, त्याचे सिमकार्ड गायब असल्याचे आणि दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार, माहिती देऊनही अद्याप घटनास्थळी कोणी भेट दिलेली नव्हती.


श्रद्धेच्या ठिकाणीच चोरट्यांचा डल्ला! मागील काही वर्षांपासून या माळावरील महादेव मंदिराविषयी भाविकांची श्रद्धा वाढत आहे. दर सोमवारी तसेच महाशिवरात्रीला येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. यंदाच्या श्रावण महिन्यातही भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले होते. त्यामुळे दानपेटीत लक्षणीय रक्कम जमा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंदिर उंच टेकडीवर असल्याने रात्रीच्या वेळी वर्दळ कमी असते. याच परिस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केल्याचा संशय भाविकांकडून व्यक्त होत आहे.

चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला आहे का? हिमायतनगर तालुक्यात चोरीच्या घटना घडत असताना आता मंदिरांनाही लक्ष्य केले जात असल्याने नागरिक आणि भाविकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरा फोडणे आणि सिमकार्ड चोरून नेणे, या प्रकारामुळे चोरट्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, याबाबत पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्टता येईल.
पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन घटनास्थळाची पाहणी करावी, पंचनामा करून चोरट्यांचा शोध घ्यावा आणि मंदिर परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. श्रद्धास्थानांमध्येही भाविकांची मालमत्ता आणि दान सुरक्षित नसेल, तर सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा कुणाकडून करायची, असा रोकठोक सवाल या घटनेनिमित्त उपस्थित होत आहे.




