माहूर, कार्तिक बेहरे| श्रीक्षेत्र माहूर येथे श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन यवतमाळकडे परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला उखळी घाटात भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जखमी झाले आहेत. शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेमुळे भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.


समोरून आलेल्या वाहनाच्या प्रकाशामुळे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज – मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ येथील एका फर्निचर दुकानात काम करणारे सहा कामगार श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूरगड येथे आले होते. दर्शन आटोपून ते एमएच २९ बीई ६८५९ क्रमांकाच्या मॅक्सिमो जितो टेम्पोने यवतमाळकडे परत जात होते.


माहूर शहराच्या पश्चिमेस सुमारे दोन किलोमीटर अंतरावर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळील पहिल्या वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रकाश चालकाच्या डोळ्यांवर पडल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर टेम्पो थेट खोल दरीत कोसळला.



दरीत फेकले गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू – या अपघातात बाबाराव ज्ञानोबा टेकाम (वय ६०), राहुल सुधाकरराव ठाकरे (वय २५) आणि प्रीतम रामराव प्रधान (वय ३८), तिघेही रा. यवतमाळ, यांचा मृत्यू झाला. वाहन दरीत कोसळताना बाहेर फेकले गेल्याने दगडावर आदळून तसेच अंगावर टेम्पो पडल्याने दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या बाबाराव टेकाम यांचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या दुर्घटनेत टेम्पोचालक प्रतीक अरविंद अडकीने (वय २६), दत्ता मनोहर मेश्राम (वय ३५) आणि यशवंत अरविंद पाटील (वय २५) हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

पोलिसांसह नागरिकांची तातडीने मदत – अपघाताची माहिती मिळताच एका भाविकाने ११२ क्रमांकावर संपर्क साधला. गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक देविदास चोपडे आणि पोलीस कर्मचारी पवन राऊत यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक चोपडे यांनी पत्रकार इलियास बावाणी आणि गोपाल चव्हाण यांच्या मदतीने दरीतून मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात पोहोचविले.
शारदा कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर श्रीनिवास यांनी क्रेन उपलब्ध करून दिल्याने दरीत कोसळलेला टेम्पो बाहेर काढण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बिपीन बाभळे यांनी जखमींवर उपचार केले.
पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सत्यपाल मडावी, संघरत्न सोनसळे, पवन राऊत तसेच होमगार्ड एस. पी. भगत आणि मुरकुटे यांनी पंचनामा केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके करीत आहेत.
उखळी घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर – उखळी घाटातील धोकादायक वळणावर घडलेल्या या दुर्घटनेमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मार्गावरील धोकादायक वळणांवर मजबूत संरक्षक कठडे, दिशादर्शक फलक, रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

