मुंबई, प्रतिनिधी| राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यभर विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत १७, १८ तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीतील आपले नाव तपासून आवश्यक नोंदणी, दुरुस्ती किंवा इतर बदलांसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.


राज्यभर निवडणूक यंत्रणा कार्यरत – या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील ३६ जिल्हा निवडणूक अधिकारी, २८८ मतदार नोंदणी अधिकारी, ७ हजार १०० सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि १ लाख २५३ केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत आहेत. विशेष शिबिरांच्या दिवशी मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून मतदारांना नाव नोंदणी, तपशिलातील दुरुस्ती आणि इतर प्रक्रियांबाबत मार्गदर्शन करतील.
कोणत्या कामासाठी कोणता अर्ज?मतदार यादीतील विविध कामांसाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेले नमुना अर्ज वापरता येतील.
- नमुना अर्ज ६ : मतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी.
- नमुना अर्ज ७ : मतदार यादीतील नाव वगळण्याची विनंती करण्यासाठी.
- नमुना अर्ज ८ : निवासस्थान बदल, मतदार यादीतील तपशिलात दुरुस्ती, नवीन मतदार ओळखपत्र मिळविणे किंवा दिव्यांग मतदार म्हणून नोंद करण्यासाठी.
मतदार नोंदणी आणि दुरुस्तीची प्रक्रिया वर्षभर सुरू असते. त्यामुळे प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनाही नमुना अर्ज ६ द्वारे नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. नागरिकांनी आपले नाव, पत्ता आणि इतर तपशील तपासून विहित मुदतीत अर्ज सादर करावेत.


अडचणींसाठी १९५० हेल्पलाइन – मतदार यादी तपासताना, अर्ज भरताना किंवा नोंदणी प्रक्रियेदरम्यान काही अडचण अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी १९५० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय कार्यालयीन वेळेत जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातील जिल्हास्तरीय मदत केंद्र किंवा संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या मदत केंद्राची मदत घेता येईल. जिल्हानिहाय हेल्पलाइन क्रमांक आणि मदत केंद्रांचा तपशील मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अधिकृत संकेतस्थळ: https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Districtvoterhelpline.aspx पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे आणि यादीतील नोंदी अचूक राहाव्यात, यासाठी नागरिकांनी विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा. आवश्यक दावे व हरकती २६ ऑक्टोबर २०२६ पूर्वी नोंदवाव्यात, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.




