Homeकरियरवाईची पी.एम.श्री.जि.प.हायस्कूल असुरक्षितच! शिक्षण विभागाचे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

वाईची पी.एम.श्री.जि.प.हायस्कूल असुरक्षितच! शिक्षण विभागाचे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहरे | माहूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे मंदिर राहिल्या नाहीत, तर असुरक्षिततेचा सापळा बनल्या आहेत. ३० सप्टेंबरला साकूर येथे वर्ग सुरू असतानाच छताचा स्लॅब कोसळून जीवघेणा अपघात घडला, तर आता वाई बाजार येथील पी.एम.श्री.जि.प.हायस्कूलमध्ये थेट शाळेच्या आवारात घुसून भटक्या कुत्र्याने वर्ग दुसरीत शिकणाऱ्या इंद्रसेन कार्तिक बेहेरे या चिमुकल्याच्या पायाचा चावा घेतला. यापूर्वीही याच शाळेत एका विद्यार्थ्याला कुत्रा चावल्याची घटना घडूनही ना शालेय शिक्षण समिती जागी झाली, ना ग्रामपंचायत प्रशासन भटके कुत्रे व जनावरांपासून सुरक्षा द्या, अशा सूचना देऊनही ग्रामपंचायत कुंभकर्णी झोपेत आहे आणि शालेय शिक्षण समितीचे काम फक्त कार्यक्रमात हार-तुऱ्यापुरतेच उरले आहे का, असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत.

या घटनेत शाळेच्या मुख्याध्यापकांची भूमिका अत्यंत बेजबाबदार आणि संतापजनक आहे. वर्गशिक्षिका एक महिन्यापासून बाल संगोपन रजेवर आहेत, प्रभारी म्हणून जाफर सय्यद यांच्याकडे जबाबदारी असताना शिक्षक मिलिंद कंधारे यांनी पालकांना फोन करून शाळेतील औषधीने प्रथमोपचार केला, पण मुख्याध्यापकांनी त्या रक्तबंबाळ झालेल्या लेकराला दवाखान्यात नेण्याची साधी औपचारिकताही दाखवली नाही. एका सरकारी शाळेचा मुख्याध्यापक जर आपल्या विद्यार्थ्याच्या जीवाचीही काळजी घेत नसेल, तर शिक्षण विभागाने अशा मुख्याध्यापकांना पदावर का ठेवावे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

आणि या बेजबाबदार शाळेला साथ देत आहे ते येथील प्राथमिक आरोग्य केंद्र. जखमी विद्यार्थ्याला घेऊन पालक आरोग्य केंद्रात गेले असता प्रभारी आरोग्य अधिकारी शेख सना यांनी नंतर या असा सल्ला दिला. पालकांनी विचारपूस केली असता माझे काही दिवसच सेवा उरली आहे, मी २० तारखेपर्यंतच आहे, टेन्शन कशाला घेवू असे अत्यंत उद्धट आणि माणुसकीला काळीमा फासणारे उत्तर दिले. कुत्रा चावणे ही अत्यंत गंभीर बाब असताना, अँटी रेबीज लस वेळेवर न मिळाल्यास लेकराचा जीव जाऊ शकतो, याचीही जाणीव या अधिकाऱ्याला नाही.ही आरोग्य अधिकारी आहे की शासनाच्या पैशावर मजा मारणारी पाहुणी?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

एकंदरीत साकूरचा स्लॅब असो की वाई बाजारचा कुत्रा चावा, या सर्व घटना शिक्षण व्यवस्थेची शोकांतिका आणि बरबटलेल्या प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे. शालेय शिक्षण समितीने फक्त फोटोपुरते न राहता शाळेच्या भिंती, कुंपण, स्वच्छता याकडे लक्ष द्यावे, शिक्षण विभागाने झोपेतून जागे होऊन धोकादायक शाळांचे ऑडिट करावे आणि अशा बेजबाबदार मुख्याध्यापक आणि उद्धट आरोग्य अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा पालकांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय उरणार नाही.

IMG 20261015 WA0025 scaled वाईची पी.एम.श्री.जि.प.हायस्कूल असुरक्षितच! शिक्षण विभागाचे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

सूचना देऊनही ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, विद्यार्थ्याला कुत्र्याचा चावा –वाई (बा.) येथील पी.एम. श्री जि.प. हायस्कूलच्या आवारात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने विद्यार्थ्यांना धोका असल्याबाबत शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक मिलिंद कंधारे व शाळा व्यवस्थापन समितीने दि.१७ ऑगस्ट २०२६ रोजीच ग्रामसेवक, ग्रामपंचायत वाई (बा.) यांना लेखी निवेदन देऊन बंदोबस्ताची मागणी केली होती. मात्र ग्रामपंचायतीने कोणतीही कार्यवाही न केल्याने अखेर वर्ग दुसरीतील विद्यार्थी इंद्रसेन बेहेरे याच्यावर शाळेच्या आवारातच कुत्र्याने हल्ला करून चावा घेतला. लेखी सूचना देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

सेवा सप्ताहमुळे गंभीर विषयाकडे दुर्लक्ष – सदर पत्राच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्राण्यांना मारण्याऐवजी शस्त्रक्रियेद्वारे उपाययोजना करण्याचे सांगितले आहे. सध्या ग्रामपंचायतीचा सेवा सप्ताह सुरू असल्याने, तो पूर्ण झाल्यानंतर याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल. अशी माहिती एल. व्ही. कनाके ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत वाई बा. यांनी दिली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments