नांदेड, अनिल मादसवार| पाणी कमी, तर पीक निवडही जपूनच! परतीच्या मान्सूनने पुरेशी साथ न दिल्याने नांदेड जिल्ह्यात जमिनीतील ओलावा घटला असून भूजल पातळीत सरासरी २.५ मीटरने घसरण झाली आहे. आगामी रब्बी हंगामात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी अधिक पाणी लागणाऱ्या पिकांच्या मोहाला बळी पडू नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.


ऊस, गहू, मका आणि चिया यांसारख्या अधिक पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करताना उपलब्ध पाण्याचा विचार न केल्यास ऐन हंगामात सिंचनाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे केवळ अपेक्षित उत्पादनाचा विचार न करता आपल्या शेतातील ओलावा, जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता तपासूनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.


पाऊस कमी, भूजल घटले; नियोजनात चूक नको! संभाव्य एल निनोच्या अंदाजावर पूर्णपणे अवलंबून न राहता प्रत्यक्ष पर्जन्यमान आणि उपलब्ध पाण्याची स्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे. जमिनीत पुरेसा ओलावा नसताना पेरणीची घाई करणे टाळावे. अन्यथा बियाणे, खते, मशागत आणि मजुरीवर केलेला खर्च धोक्यात येऊ शकतो.
कमी पाण्यातील पिकांना द्या प्राधान्य – मध्यम काळी जमीन आणि मर्यादित पाणी उपलब्ध असलेल्या क्षेत्रात कृषी विद्यापीठाच्या शिफारशींनुसार करडई, हरभरा आणि रब्बी ज्वारी या पिकांचा विचार करावा.
- करडई : परभणी सुवर्णा (PBNS-154), परभणी कुसुम (PBNS-12) यांसह शिफारशीत वाणांचा विचार करावा.
- रब्बी ज्वारी : खोल काळ्या जमिनीत अवशिष्ट ओलावा चांगला असल्यास परभणी सुपर मोती (SPV-2407), परभणी मोती (SPV-1411) आणि पीकेव्ही क्रांती या वाणांचा विचार करावा.
- हरभरा : पुरेसा ओलावा असलेल्या जमिनीत विजय, दिग्विजय, आकाश आणि जाकी-९२१८ या वाणांपैकी स्थानिक परिस्थितीला अनुकूल वाण निवडावा.

