श्रीक्षेत्र माहूर,कार्तिक बेहेरे| महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री रेणुकादेवी गडावर आज दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वेदमंत्रांच्या जयघोषात घटस्थापना मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली. संस्थानच्या अध्यक्षा तथा धर्मादाय आयुक्त हिरा शेळके यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. याप्रसंगी श्रीच्या मूर्तीला पारंपरिक अलंकार चढवून महाआरती करण्यात आली.


या पूजाविधीचे पौरोहित्य भवानीदास भोपी, शुभम भोपी, उज्वल भोपी आणि पवन भोपी यांनी केले. यावेळी कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजित जगताप, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, विनायक फांदाडे, अरविंद देव, अनिल काण्णव आदी मान्यवर उपस्थित होते. स्त्री शक्ती पूजेचे विशेष महत्त्व लक्षात घेऊन अध्यक्षा हिरा शेळके यांनी पतीसमवेत कुमारीका व सुवासिनी पूजन केले. छबीना काढून परिसर देवता पूजन झाल्यानंतर मातेला नैवेद्य अर्पण करून महाप्रसादाला सुरुवात झाली, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.



या मंगल पर्वावर विविध भागातून आलेल्या हजारो भाविकांनी मातेचे दर्शन घेतले. यामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार संतोष बांगर यांनी सहपत्नीक दर्शन घेतले. यावेळी ज्योत प्रज्वलित करून घेऊन जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती, त्यामुळे संपूर्ण गड परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.




मागील काही दिवसांपूर्वी मंदिराच्या पायऱ्यांवरील दुकानांसमोर करण्यात आलेल्या शेडच्या सिलिंगचे काही भाग अचानक गळून पडल्याचे निदर्शनास आले. सुदैवाने कोणत्याही भाविकाला दुखापत झाली नाही, मात्र कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे, मुख्य टी-पॉईंट आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्रासमोरील मुख्य रस्त्यावर पोलीस प्रशासन व कर्मचारी नसल्याने भाविकांच्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी झाली होती, ज्यामुळे भाविकांना काही काळ गैरसोय सहन करावी लागली.

