हिमायतनगर, अनिल मादसवार| शनी अमावस्येच्या पावन पर्वानिमित्त वाढोणा येथील कणकेश्वर तलावाच्या काठावरील शनी देवाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. शनिदेवाच्या दर्शनाने आणि प्रार्थनेने परिसरातील धार्मिक वातावरण भक्तिमय झाले. यावेळी वामनराव वडगावकर यांनीही शनिदेवाच्या चरणी नतमस्तक होत शेतकरी बांधवांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.


सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी विविध संकटांचा सामना करीत आहेत. पिकांचे नुकसान, पावसाची अनिश्चितता आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई यामुळे बळीराजा चिंतेत आहे. या पार्श्वभूमीवर वामनराव वडगावकर यांनी दिनांक 10 शनिवारी आलेल्या अमावसेच्या पार्शवभूमीवर शनिदेवाकडे शेतकऱ्यांवरील संकटे दूर करण्याचे साकडे घातले.


“शेतकऱ्यांवर आलेली संकटे दूर होवोत, कोपलेला निसर्ग पुन्हा बळीराजावर कृपावंत होवो आणि आगामी काळातील पाणीटंचाईच्या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा मिळो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
राज्य सरकारनेही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आवश्यक आर्थिक मदत द्यावी, पाण्याचे योग्य नियोजन करावे आणि संकटाच्या काळात सर्वतोपरी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“हे शनिदेवा, बळीराजाच्या कष्टांना यश दे, शेतात पुन्हा हिरवळ फुलू दे आणि प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे,” अशी प्रार्थना करीत त्यांनी शेतकरी बांधवांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शनिदेवाच्या चरणी श्रद्धापूर्वक नमन केले. यावेळी पुरोहित परमेश्वर बडवे यांच्या मधुर वाणित अभिषेक महापूजा करण्यात आली. यावेळी मंदिराचे देखरेख करणारे भास्कर मामा चिंतावार, डॉ आगलावे, अनिल मादसवार, अशोक तुंबलवाड, रमेश डांगे, धम्पलवार सावकार आदिसह अनेक भाविक भक्त उपस्थित होते.

