हिमायतनगर, अनिल मादसवार गेल्या अनेक दिवसांपासून हिमायतनगर शहरासह तालुका परिसरात पावसाने खंड दिल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिके करपू लागली असून, खरीप हंगाम धोक्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या बैलपोळा सणावरही कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले आहे.



बैलपोळा हा शेतकरी आणि बैलांमधील जिव्हाळ्याचे नाते जपणारा महत्त्वाचा सण मानला जातो. या सणानिमित्त शेतकरी आपल्या बैलांना सजवून त्यांची पूजा करतात. मात्र यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.



हिमायतनगर शहरातील बाजारपेठेत बैलपोळ्यानिमित्त लागणारे विविध साहित्य, सजावटीच्या वस्तू, रंग, दोर, गोंडे आदींची दुकाने सजली आहेत. तर पूजेसाठी लागणारी मातीच्या बैलजोडया बाजारात दाखल झाल्या आहेत. मात्र पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने बाजारपेठेत अपेक्षित गर्दी दिसून येत नाही. व्यापारीही ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.




एकीकडे पावसाचा लांबलेला खंड आणि दुसरीकडे वाढती महागाई यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे यंदाचा बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याऐवजी साध्या पद्धतीने आणि परिस्थितीनुरूप साजरा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाने लवकर हजेरी लावून करपण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांना जीवदान द्यावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. प्रशासनाने देखील शेतकऱ्याच्या आर्थिक संकटाची चाहूल लक्षात घेऊन खचून जाणाऱ्या बळीराजाला हातभार लावण्यासाठी पुढे यायला हवे अशा प्रतिक्रिया देखील आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत.

