Homeनांदेडकोरोना : मी माझे मरण डोळ्यांनी पाहिले!

कोरोना : मी माझे मरण डोळ्यांनी पाहिले!

कोरोना…हे नाव उच्चारले तरी एक काळोख डोळ्यांसमोर उभा राहतो. रस्ते ओस पडले होते. घरांची दारे बंद होती. माणूस माणसाला घाबरत होता. स्पर्श म्हणजे धोका, जवळीक म्हणजे संकट आणि शिंक किंवा खोकला म्हणजे जणू मृत्यूची चाहूल. असे भयाचे वातावरण सर्वत्र निर्माण झाले होते.

त्या काळात मात्र एक वेगळीच गोष्ट मनात सतत घोळत होती.भीतीने घरात बसायचे की गरजेच्या माणसासाठी घराबाहेर पडायचे? प्रश्न साधा होता; पण उत्तर सोपे नव्हते.
कोरोनामुळे अनेकांचे रोजगार बंद झाले. हातावर पोट असणाऱ्यांच्या हातातील कामच निघून गेले. कुणाच्या घरात चूल पेटत नव्हती, कुणाच्या घरात दोन वेळच्या अन्नाची चिंता होती. आजारापेक्षा उपासमार मोठी ठरत होती. अशा परिस्थितीत केवळ कोरोनाविषयी चर्चा करून किंवा सोशल मीडियावर सहानुभूती व्यक्त करून मन शांत होईना.म्हणून शक्य तेवढे काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.

रियाज नावाच्या एका युवकाला सोबत घेतले आणि उपेक्षित, उपाशी व्यक्ती व कुटुंबांपर्यंत अन्न पोहोचवण्याचे काम सुरू केले. सुरुवातीला हा एक छोटासा प्रयत्न होता. स्वतःच्या आणि मित्रमंडळींच्या कुवतीनुसार जे शक्य होते ते करायचे, एवढाच त्यामागचा हेतू.पण चांगल्या हेतूची एक विलक्षण ताकद असते.आपण एखादे चांगले पाऊल उचलले की कधी कधी आपल्यापेक्षा कितीतरी मोठी पावले उचलण्याची क्षमता असलेली माणसे पुढे येतात.आणि तसेच घडले.प्रारंभीचा छोटासा प्रयत्न अनेकांच्या मनाला भिडला. आमच्यापेक्षा कितीतरी अधिक आर्थिक आणि सामाजिक क्षमता असलेल्या व्यक्तींनी या उपक्रमात रस घेतला. मदतीचे हात पुढे आले. प्रयत्नांना बळ मिळाले. आणि हळूहळू एक गोष्ट निश्चित झाली.कोरोनाच्या काळात आपल्या परिसरात शक्यतो कोणीही उपाशी राहू नये.या कार्यात समाधान होते; पण त्याचवेळी बाहेरच्या जगात मृत्यूचे सावट अधिकच गडद होत होते.

आणि मग एक दिवस… अत्यंत वृद्ध असलेल्या एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी कानावर आली.त्या एका घटनेने मनात अनेक प्रश्न उभे केले.मी त्या काळात सार्वजनिक ठिकाणी वावरत होतो. घरात माझी आई, श्रीमती भागरथबाई गावातील ज्येष्ठ व्यक्तींपैकी एक. घरात नातवंडांसह लहान बालकही होते. त्यामुळे केवळ स्वतःची नव्हे, तर घरातील प्रत्येकाची काळजी घेणे आवश्यक होते.

मनाने निर्णय घेतला – आरटीपीसीआर चाचणी करून घ्यायची. डॉक्टरांना मात्र माझ्यात कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. त्यामुळे चाचणी करण्याची विशेष गरज त्यांना वाटत नव्हती.पण माझा आग्रह कायम होता.शेवटी माझे मित्र, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागेश लखमावार यांनी परिचारिका आणि चिकित्सकांना माझी आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश दिले.

चाचणी झाली.आता फक्त अहवालाची प्रतीक्षा होती.एक दिवस गेला.दुसरा दिवसही गेला.अहवाल मात्र आला नाही.मला कोणतीही लक्षणे नव्हती. त्यामुळे मनातही कोणतीही शंका नव्हती. उलट मन अगदी निश्चिंत होते.कारण त्या काळात एक सर्वसाधारण समज मनात दृढ झाला होता. लक्षणे नाहीत, म्हणजे कोरोना नाही.पण नियतीला कदाचित काही वेगळेच दाखवायचे होते.अहवाल आला.आणि त्या कागदाच्या एका छोट्याशा निष्कर्षाने माझ्या आयुष्याभोवती जणू वादळ उठले—

पॉझिटिव्ह! क्षणभर मला स्वतःलाच विश्वास बसला नाही. ज्याला कोणतेही लक्षण नाही, जो नेहमीप्रमाणे फिरत आहे, काम करत आहे, लोकांना भेटत आहे—तो पॉझिटिव्ह कसा?परंतु त्या काळात अहवाल म्हणजे अंतिम सत्य मानले जात होते.काही अहवाल चुकीचे येत असल्याच्या चर्चा होत्या. काही लोकांना कोणतीही लक्षणे नसतानाही पॉझिटिव्ह घोषित केले जात होते. परंतु त्या क्षणी कोणालाही त्याची चिकित्सा करण्याची उसंत नव्हती.

अहवाल पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह! आणि त्यानंतर जे घडले ते माझ्या आयुष्यातील सर्वात विचित्र, अविश्वसनीय आणि काळजाचा ठोका चुकवणारे पर्व ठरले.पॉझिटिव्ह अहवालाच्या पत्त्यावरून परिसर सील केला जात होता. गल्ली बंद होत होती. रस्ते बंद होत होते. घराभोवती संशयाची अदृश्य भिंत उभी राहत होती.माझ्या नावाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि नांदेडच्या गोकुळ नगरात शोककळा पसरली.

पण ही शोककळा माझ्या आजारपणासाठी नव्हती.ती तर…माझ्या मृत्यूच्या अफवेसाठी होती!कुठून, कशी आणि कोणाच्या तोंडून ही बातमी बाहेर पडली, हे मला त्या वेळी कळले नाही. पण अफवा पसरली.“ मुंडकर गेले!”काहींना मी या जगात नसल्याचे निरोप मिळाले.काही जणांनी माझ्या आठवणी काढल्या.काहींच्या डोळ्यांत अश्रू आले. काहीजण माझ्यासाठी रडले. आणि मी? मी जिवंत होतो! माझ्या सभोवती लोक कोरोनाची भीती बाळगत होते आणि दूर कुठेतरी माझ्या मृत्यूची बातमी पसरत होती.ही परिस्थिती इतकी विचित्र होती की, स्वतःच्या जिवंतपणाचा पुरावा स्वतःलाच द्यावा लागावा, अशी वेळ आली होती.मात्र या अंधाऱ्या प्रसंगात एक प्रकाशकिरणही होता माणुसकीचा.

माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझ्याशी आपुलकीचे नाते जपणाऱ्या अनेकांनी माझ्याशी संपर्क ठेवला. कुणी फोन केला, कुणी संदेश पाठवला, कुणी दृकश्राव्य माध्यमातून चित्रफीत तयार केली. माझ्यासाठी प्रार्थना केली. “लवकर बरे व्हा,” असे सांगत मानसिक बळ दिले.

मूळचे सोलापूरवासी आणि नांदेडला स्थायिक झालेले अर्थतज्ज्ञ भारत दायमा यांनी या उपक्रमात विशेष पुढाकार घेतला.प्रसिद्ध व्यावसायिक निलेश व्यास, आर्थिक विश्लेषक श्रीपाद विष्णुपुरीकर, वकील नागनाथ बुद्धलवाड, प्रसिद्ध व्यावसायिक चैतन्य जालनेकर, सिडकोचे प्रतिष्ठित नागरिक विजय भोसले, प्रशिक्षक समीर कानडखेडकर, व्यवस्थापक विशाल खरवडकर, शंभू देव प्रसाद आणि अशा असंख्य मित्रांचे संदेश माझ्यापर्यंत पोहोचत होते.प्रत्येक संदेशामागे एकच भावना होती.

“तुम्ही लवकर बरे व्हा.” पण या सर्वांमध्ये एक व्यक्ती अशी होती, ज्याने केवळ शब्दांनी नव्हे, तर कृतीने माझ्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला.शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. बालाजी गेंदेवाड.त्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा केली नाही. माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी त्यांनी अक्षरशः जीवापाड मेहनत घेतली. ते कुटुंबातील सदस्याप्रमाणे उभे राहिले.दवाखान्यात असताना मला एकही दिवस दवाखान्यातील अन्न खाऊ दिले नाही. घरच्या माणसाप्रमाणे माझ्या अन्नाची, गरजांची आणि कुटुंबाची काळजी घेतली.

आज मागे वळून पाहताना जाणवते.. कोरोनाने माणसांमध्ये अंतर निर्माण केले होते; पण काही माणसांनी त्या अंतरावर माणुसकीचा पूल बांधला होता.दरम्यान, प्रशासनाने संपूर्ण गोकुळ नगर बंद केले. बाहेर जगाला वाटत होते की संकट आले आहे.आणि काहींच्या कानावर तर त्याहून भयंकर बातमी पोहोचली होती. मुंडकर राहिले नाहीत.दिवस गेले.एक-दोन नव्हे…तब्बल दहा दिवस. दहा दिवसांनंतर नांदेडमधील काही मित्रांचे फोन आले. त्यांना काहीतरी वेगळेच कळले होते.

“ मुंडकर , जिवंत आहेत!”
माझ्या जिवंत असण्याची बातमी त्यांच्यासाठी बातमी नव्हती; ती आनंदाची पर्वणी होती.ज्यांनी माझ्यासाठी रडले होते, ते मला जिवंत पाहून पुन्हा रडले.पण यावेळी आनंदाने.“तुम्ही जिवंत आहात,हे पाहून किती आनंद झाला,” असे म्हणताना त्यांच्या आवाजातला कंप आजही आठवतो.त्या क्षणी मला एक विलक्षण अनुभव आला. माणूस आपल्या मृत्यूला घाबरतो.मृत्यूचे नाव आले की मन अस्वस्थ होते.पण माझ्यासाठी त्या काळात, “मृत्यू ” काही काल्पनिक घटना राहिली नव्हती. मी माझे मरण डोळ्यांनी पाहिले होते.मी स्वतःच्या मृत्यूच्या कथा ऐकल्या होत्या.माझ्यासाठी लोक रडल्याचे ऐकले होते.

माझ्या आठवणी काढल्या गेल्याचे ऐकले होते. माझ्या निधनाचे निरोप इतरांना गेल्याचे कळले होते. आणि त्या सगळ्या काळात… मी जिवंत होतो. मृत्यू माझ्यापासून दूर कुठेतरी उभा नव्हता.तो माझ्या नावाने माझ्यापूर्वीच समाजात पोहोचला होता.मी मात्र त्याच्याकडे पाहत होतो—बिनधास्त. ना भीती. ना अस्वस्थता. ना परिस्थितीचा अतिरेक. फक्त एक विलक्षण तटस्थता. त्या अनुभवाने मला आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली.

आपण जिवंत असताना आपल्याला आपल्या अस्तित्वाची किंमत कळत नाही. आपण कोणासाठी किती महत्त्वाचे आहोत, हेही अनेकदा आपल्याला समजत नाही.पण आपल्या मृत्यूची बातमी जिवंतपणी ऐकण्याची वेळ आली, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते.माणूस स्वतःला जितका ओळखतो, त्यापेक्षा समाज त्याच्याविषयी अधिक काही जपून ठेवलेला असतो.त्या दहा दिवसांत माझे मरण माझ्यापूर्वी जगभर फिरून आले होते.लोकांनी माझ्यासाठी अश्रू ढाळले होते.
मित्रांनी आठवणी काढल्या होत्या.कुणी प्रार्थना केली होती.कुणी धीर दिला होता.आणि शेवटी…मी त्यांच्यासमोर पुन्हा उभा राहिलो.जणू मृत्यूच्या दारातून परत आलेला माणूस नव्हे, तर मृत्यूची बातमी ऐकूनही त्याच्याकडे निर्विकारपणे पाहणारा एक साक्षीदार.

कोरोनाने माझ्याकडून काही घेतले असेल तर त्याची किंमत मोठी होती; पण त्याने मला एक अमूल्य गोष्ट दिली. माणसांचे खरे चेहरे पाहण्याची संधी.भीतीच्या काळात कोण दूर गेले, कोण जवळ आले, कोण शब्दांनी सोबत राहिले आणि कोण प्रत्यक्ष कृतीत उतरले.हे त्या काळाने स्पष्ट केले.आणि म्हणूनच आजही कोरोना आठवला की मला फक्त आजार आठवत नाही. मला आठवतो तो उपाशी माणसाचा चेहरा…मदतीला धावून आलेले हात… बालाजी गेंदेवाड यांची निस्वार्थ सेवा…मित्रांचे अश्रू… गोकुळ नगरावर आलेली बंदी…आणि सर्वांत महत्त्वाचे, माझ्या जिवंतपणी माझ्या मृत्यूची बातमी ऐकण्याचा तो विलक्षण अनुभव.

कोरोनाने मला शिकवले..
मृत्यू कधी कधी येण्यापूर्वीच समाजात पोहोचतो.पण माणूस त्याहून मोठा असतो.कारण मृत्यूची बातमी पसरू शकते…माणुसकी मात्र मरत नाही. चांगल्या -वाईट घटना, खरे -खोटे अहवाल,भले- बुरे माणसे,मृत्यूची बातमी, स्थिती, परिस्थिती, मी उघड्या डोळ्यांनी पाहिलो.

लेखक — गोविंद मुंडकर, मोबाईल – 8329095303

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments