Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

नांदेड जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

३० सप्टेंबरपूर्वी दावे-हरकती नोंदविण्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

नांदेड| भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.

प्रारूप मतदार यादी सर्व तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये तसेच संबंधित मतदान केंद्रांवर नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अनुपस्थित, स्थलांतरित, मयत आणि दुबार मतदारांची यादी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती – प्रारूप मतदार यादीवर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. प्राप्त दावे-हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा २९ ऑक्टोबरपर्यंत करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

जिल्ह्यातील मतदारांनी प्रारूप यादीत आपले नाव, पत्ता आणि इतर तपशील अचूक आहेत की नाही, याची पडताळणी करावी. मतदारांना भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर ऑनलाइन यादी तपासता येणार आहे. संबंधित बीएलओ, तहसील कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयातही यादी पाहता येईल.

१८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नागरिकांना नोंदणीची संधी – १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणारे नागरिक नवमतदार म्हणून नोंदणीस पात्र आहेत. पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह नमुना ६ चा अर्ज सादर करावा. नमुना ६ नवीन मतदार नोंदणीसाठी, नमुना ६-अ परदेशस्थित भारतीय मतदारांसाठी, नमुना ७ मतदार यादीतील नावावर हरकत किंवा नाव वगळण्यासाठी, तर नमुना ८ नाव, वय, पत्ता आदी तपशीलातील दुरुस्ती किंवा स्थलांतरासाठी वापरता येणार आहे.

नोटीस मिळालेल्या मतदारांनी कागदपत्रांसह उपस्थित राहावे – मतदार यादीतील नाव, वय किंवा अन्य तपशीलातील विसंगती अथवा अनमॅपिंगच्या संदर्भात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनी सुनावणीच्या वेळी जन्मतारीख व जन्मस्थळ सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.

जन्मतारीख व जन्मस्थळाच्या पुराव्यासाठी जन्म प्रमाणपत्र, पारपत्र, मान्यताप्राप्त मंडळ अथवा विद्यापीठाचे शैक्षणिक प्रमाणपत्र, कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, कौटुंबिक नोंदवही, शासनाकडील जमीन अथवा घर वाटप प्रमाणपत्र यासह विविध कागदपत्रांचा पुरावा म्हणून विचार केला जाऊ शकतो. संबंधित प्रकरणानुसार आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

पात्र मतदारांनी नावाची खात्री करावी – “लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी, विशेषतः नवमतदारांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील आणि परिसरातील सर्व पात्र मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत आहेत की नाहीत, याची खात्री करावी,” असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

नजरचुकीने पात्र मतदाराचे नाव वगळले असल्यास नमुना ६ द्वारे नोंदणी करावी. नाव किंवा अन्य तपशिलात त्रुटी असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी संबंधित बीएलओ किंवा ऑनलाइन पोर्टलवर दावे व हरकती नोंदवाव्यात, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे, तर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील करता येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments