नांदेड| भारतातील लायनिझमच्या ७० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा उत्सव वर्षभर विविध सेवा व जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर लायनिझमच्या प्रचार-प्रसारासाठी तसेच सामाजिक जनजागृतीसाठी माजी राज्यमंत्री तथा लायन डी. पी. सावंत यांची ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४ एच-२चे जिल्हा प्रांतपाल लायन दत्तात्रय औसेकर यांनी ही नियुक्ती केली.



लायन डी. पी. सावंत हे गेल्या ३५ वर्षांपासून लायन्स क्लब नांदेड मिडटाऊनचे सदस्य म्हणून लायनिझमच्या सेवाकार्यात सक्रिय आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील त्यांचे योगदान तसेच व्यापक जनसंपर्काचा उपयोग करून लायन्सच्या ‘We Serve’ या सेवाभावी संदेशाचा समाजातील विविध घटकांपर्यंत प्रभावीपणे प्रसार करण्याचा उद्देश या नियुक्तीमागे आहे.



जिल्हा प्रांतपाल लायन दत्तात्रय औसेकर म्हणाले की, लायनिझमची ७० वर्षांची वाटचाल हा केवळ उत्सव नसून गरजूंच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या हजारो लायन्स सदस्यांच्या निःस्वार्थ सेवेला अभिवादन करण्याची ऐतिहासिक संधी आहे. या गौरवशाली सेवापरंपरेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी लायन डी. पी. सावंत यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या नियुक्तीबद्दल नांदेड लायन्स परिवाराच्या वतीने लायन डी. पी. सावंत यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



यावेळी उपप्रांतपाल लायन योगेश जायसवाल, माजी प्रांतपाल ॲड. प्रविण अग्रवाल, जीएसटी समन्वयक रवी कडगे, लायन्स क्लब नांदेड मिडटाऊनचे अध्यक्ष सरताजसिंग कंधारवाले, लायन मनीष माकन, क्षेत्रीय अध्यक्ष, कोषाध्यक्ष केदार मालपाणी, लायन सतीश सामते, लायन विजय होकर्णे, लायन बसवराज निरणे आदी उपस्थित होते. ‘७० वर्षे सेवा, ७० वर्षे समर्पण आणि ७० वर्षे मानवतेची साथ’ या भावनेतून वर्षभर विविध सेवा प्रकल्प, जनजागृती कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

