हिमायतनगर (वाढोणा), अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटलेली असताना मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीचा ताण कमी करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी हिमायतनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. सक्तीच्या कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती देऊन संकटग्रस्त कुटुंबांना दिलासा द्यावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात येत असल्याची माहिती वामनराव पाटील वडगावकर यांनी दिली.


तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका शेती आणि मजुरीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना बसत आहे. उत्पन्नाची साधने मर्यादित झाली असताना कर्जाचे हप्ते भरण्याची जबाबदारी कायम आहे. अशा परिस्थितीत कर्जवसुलीचा अतिरिक्त ताण कुटुंबांच्या अडचणी वाढवू शकतो, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने मांडली आहे.


मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या सक्तीच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी, दुष्काळग्रस्त शेतकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिलासा द्यावा आणि कर्जदारांच्या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.



दुष्काळाच्या काळात ग्रामीण जनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असताना शासनाने केवळ परिस्थितीचा आढावा न घेता कर्जदारांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका वामनराव पाटील वडगावकर यांनी मांडली.
मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीबाबत शासन कोणती भूमिका घेते आणि संकटात सापडलेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी काय निर्णय घेते, याकडे हिमायतनगर तालुक्यातील कर्जदारांचे लक्ष लागले आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांनी या मागणीची दखल घ्यावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

