Homeनांदेडनांदेडला वाहतूक समस्या आहेच; शहराला बससेवा सुरळीत मिळावी : गजानन जोशी

नांदेडला वाहतूक समस्या आहेच; शहराला बससेवा सुरळीत मिळावी : गजानन जोशी

बंद पडलेल्या सार्वजनिक बससेवेकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; वाहतूक सर्वेक्षणापेक्षा आधी मूलभूत सुविधा सक्षम करण्याची मागणी

नांदेड, प्रतिनिधी| नांदेड शहरातील वाढती वाहतूक कोंडी, वाहनांची वाढती संख्या आणि अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील बंद पडलेली बससेवा तातडीने सुरळीत करून नागरिकांना सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शहर विकास व वाहतूक सुधारणा समितीचे सहसचिव गजानन जोशी यांनी केली आहे.

नांदेड महानगरपालिकेला जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्यूअल मिशन (JNNURM) अंतर्गत मिळालेल्या बसेस सध्या अडगळीत पडल्याची चर्चा आहे. नागरिकांसाठी नियमितपणे सेवा देणारी ही बससेवा गेल्या अनेक वर्षांपासून बंद असताना ती पुन्हा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित पाठपुरावा होत नसल्याबद्दल जोशी यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, केंद्र सरकारच्या CSIR–Central Road Research Institute (CRRI) मार्फत नांदेड शहरातील वाहतुकीचे सर्वेक्षण सुरू असून, त्याआधारे महाराष्ट्र शासनाकडून Comprehensive Mobility Plan (CMP) तयार केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शहरातील मूलभूत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्याप सुरळीत नसताना नव्याने सर्वेक्षण करण्याची आवश्यकता कितपत आहे, असा सवाल जोशी यांनी उपस्थित केला आहे.

वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी वाहतूक पोलिसांना आधुनिक प्रशिक्षण देणे, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे तसेच नांदेडला वाहतूक उपअधीक्षक कार्यालय मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वाहतूक नियंत्रणासाठी उपलब्ध असलेल्या आधुनिक साधनांचा प्रभावी वापर होतो आहे का, याचाही आढावा घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

बससेवा सुरू झाल्यास वाहतूक कोंडीवरही नियंत्रण – नांदेड शहरात हजारो रिक्षा, चारचाकी वाहने आणि मोठ्या संख्येने दुचाकी दररोज रस्त्यावर धावत आहेत. सक्षम सार्वजनिक बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे जोशी यांनी नमूद केले.

शहरातील सार्वजनिक बससेवा नियमित आणि सक्षमपणे सुरू झाल्यास नागरिकांना पर्यायी प्रवासाची सुविधा मिळेल. परिणामी खासगी वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूक नियंत्रणास मोठी मदत होऊ शकते, असा दावा त्यांनी केला. नांदेडमध्ये खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक तसेच विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी कार्यरत असताना गेल्या पाच-सहा वर्षांपासून बंद असलेली बससेवा त्यांच्या निदर्शनास का आली नाही, असा सवालही गजानन जोशी यांनी उपस्थित केला.

‘मेट्रोच्या गप्पांपेक्षा आधी बससेवा सुरळीत करा’ – नांदेड शहर भविष्यात मेट्रोच्या दिशेने वाटचाल करणारे शहर असल्याचे सर्वेक्षणातून समोर आल्याच्या चर्चेवरही जोशी यांनी भाष्य केले. “नांदेडकरांना सध्या भविष्यकालीन आश्वासनांपेक्षा वर्तमानातील सुविधा महत्त्वाच्या आहेत. आधी शहरातील बससेवा सुरळीत करा आणि त्यानंतर मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पांबाबत चर्चा करा,” असे त्यांनी म्हटले.

शहरातील वाढती वाहतूक समस्या लक्षात घेता सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून बंद पडलेली बससेवा तातडीने सुरू करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, अशी जनहिताची मागणी गजानन जोशी यांनी केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments