कंधार, सचिन मोरे | महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलद्वारे राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत कंधार तालुक्यातील संगुचीवाडी येथील दोन तरुणांची शिक्षकपदी निवड झाली आहे. भास्कर सुभाष घुमे यांची जि.प. प्राथमिक शाळा, गडचिरोली येथे, तर विजय बाबुराव बीजे यांची जि.प. प्राथमिक शाळा, यवतमाळ येथे नियुक्ती झाली आहे. त्यांच्या यशामुळे संगुचीवाडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.



ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाच्या जोरावर शिक्षकपदापर्यंत मजल मारलेल्या या दोन्ही तरुणांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे संगुचीवाडीच्या शैक्षणिक लौकिकात भर पडली असून, गावातील विद्यार्थ्यांसाठीही हे यश प्रेरणादायी ठरले आहे.



या यशाबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र येईलवाड यांच्या हस्ते भास्कर सुभाष घुमे आणि विजय बाबुराव बीजे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दोन्ही तरुणांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



यावेळी ज्ञानोबा माऊली वारकड, सुखदेव येईलवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही तरुणांनी मिळविलेल्या यशामुळे गावातील तरुणाईमध्येही शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे.

