Homeनांदेडवडार समाजाचे स्थलांतर रोखण्यासाठी नऊ महिने रोजगार द्या; प्रत्येक भूमिहीन कुटुंबाला ५...

वडार समाजाचे स्थलांतर रोखण्यासाठी नऊ महिने रोजगार द्या; प्रत्येक भूमिहीन कुटुंबाला ५ एकर जमीन उपलब्ध करा!

हिमायतनगर तहसीलदारांकडे राजू उर्फ तुकाराम देवकर यांचे निवेदन; मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर (वाढोणा) तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई आणि रोजगाराच्या अभावामुळे वडार समाजातील गरीब व भूमिहीन कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी परराज्यांत तसेच इतर जिल्ह्यांत स्थलांतर करावे लागत आहे. या स्थलांतरामुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण खंडित होत असून, कुटुंबांना गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. वडार समाजाचे स्थलांतर रोखण्यासाठी ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या नऊ महिन्यांच्या कालावधीत रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच पात्र भूमिहीन कुटुंबांना नियमानुसार शासकीय पाच एकर शेतजमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू उर्फ तुकाराम रामभाऊ देवकर यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी हिमायतनगरचे तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, संबंधित मंत्री, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासह पत्रकारांना पाठविण्यात आल्या आहेत.

मनरेगाअंतर्गत नऊ महिने रोजगाराची मागणी – वडार समाजाचा पारंपरिक दगड फोडण्याचा व्यवसाय जवळपास बंद पडल्याने अनेक कुटुंबांसमोर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) पात्र मजुरांना मागणीनुसार काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. गावपातळीवर जलसंधारण, मृदसंधारण, रस्ते आणि इतर विकासकामे सुरू करून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करावी, अशीही भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.

भूमिहीन कुटुंबांना शेतीचा आधार द्या – वडार समाजातील रोजगारापासून वंचित कुटुंबांचे सर्वेक्षण करून विशेष कृती आराखडा तयार करावा. पात्र भूमिहीन कुटुंबांना शासनाच्या नियमांनुसार प्रत्येकी पाच एकर शेतजमीन उपलब्ध करून दिल्यास त्यांना शेतीतून उत्पन्न मिळवता येईल आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य होईल, असे देवकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आणि शैक्षणिक सवलती द्या – वडार समाजातील मुला-मुलींचे शिक्षण सुरू राहावे, यासाठी तालुकास्तरावर मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करावी. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक शैक्षणिक सवलती द्याव्यात, तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील पात्र कुटुंबांना तातडीने मिळवून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

वडार समाजातील गरीब कुटुंबांना त्यांच्या मूळ गावातच रोजगार उपलब्ध झाल्यास स्थलांतर रोखण्यास मदत होईल. त्याचबरोबर मुलांचे शिक्षण आणि कुटुंबांचे आर्थिक स्थैर्य टिकून राहू शकेल. त्यामुळे संबंधित विभागांना तातडीने निर्देश देऊन केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, तसेच ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर कार्यवाहीची माहिती प्रसिद्ध करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा वडार समाजाला न्याय मिळवण्यासाठी लोकशाही मार्गाने राज्यव्यापी आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजू उर्फ तुकाराम देवकर यांनी दिला आहे. यावेळी महेश गायकवाड,  संतोष मुदेवाड यांची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments