Homeआरोग्यगंभीर आजारांवरील उपचारांसाठी डॉ. आंबेडकर वैद्यकीय सहाय्यता योजनेत भरीव वाढ

गंभीर आजारांवरील उपचारांसाठी डॉ. आंबेडकर वैद्यकीय सहाय्यता योजनेत भरीव वाढ

नांदेड जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा; पात्र रुग्णांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान, नवी दिल्ली यांच्यामार्फत ‘डॉ. आंबेडकर वैद्यकीय सहाय्यता योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असून, विविध गंभीर आजारांच्या उपचारांसाठी देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्याच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. तसेच पात्र आजारांची व्याप्तीही वाढविण्यात आली आहे.

महागड्या वैद्यकीय उपचारांमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गरजू कुटुंबांना या योजनेमुळे मोठा आधार मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यातील पात्र व गरजू नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

योजनेसाठी पात्रता व उत्पन्नाची अट  – या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्ण हा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पात्रता सिद्ध करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला तसेच विहित उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.

गंभीर आजारांनुसार मिळणारे आर्थिक सहाय्य – योजनेअंतर्गत विविध गंभीर आजारांच्या उपचारांसाठी पुढीलप्रमाणे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.  अवयव प्रत्यारोपण – ३ लाख ५० हजार रुपये, किडनी शस्त्रक्रिया व डायलिसिस – ३ लाख ५० हजार रुपये, कॅन्सर उपचार (शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिओथेरपी) – २ लाख ५० हजार रुपये, मेंदूची शस्त्रक्रिया – २ लाख रुपये, इतर जीवघेणे गंभीर आजार – २ लाख रुपये, हृदय शस्त्रक्रिया – १ लाख ५० हजार रुपये, मणक्याची शस्त्रक्रिया – १ लाख ५० हजार रुपये याप्रमाणे सहाय्य मिळणार आहे.  यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांचा मोठा आर्थिक खर्च परवडत नसलेल्या पात्र रुग्णांना उपचारासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत होणार आहे.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे – योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. यामध्ये सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला, वार्षिक उत्पन्नाचा दाखला, मान्यताप्राप्त रुग्णालयाचे उपचाराचे अंदाजपत्रक (एस्टिमेट बिल), वैद्यकीय अहवाल, आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तसेच बँक पासबुकची झेरॉक्स प्रत यांचा समावेश आहे. बँक पासबुकची झेरॉक्स प्रत सादर करणे अनिवार्य आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पूर्ण स्वरूपात जोडणे आवश्यक असून, अपूर्ण अर्ज अथवा आवश्यक कागदपत्रांचा अभाव असल्यास अर्जाच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात.

अर्ज करण्याची प्रक्रिया – योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान, नवी दिल्ली यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतो. अर्जदाराने अर्जातील आवश्यक माहिती अचूक व परिपूर्ण भरून, त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. त्यानंतर जिल्हाधिकारी व समाज कल्याण अधिकारी यांच्या शिफारस पत्रासह सदर अर्ज डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान, नवी दिल्ली कार्यालयाकडे सादर करावा.

गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असलेल्या नांदेड जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र रुग्णांनी या योजनेची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. या योजनेचा लाभ घेऊन महागड्या वैद्यकीय उपचारांचा आर्थिक भार कमी करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments