नांदेड| मुंबईवर २६/११ रोजी झालेला दहशतवादी हल्ला आज सबंध देशावर आघात करणारा होता. हा हल्ला परतवून लावण्यासाठी महाराष्ट्र पोलीस व केंद्रातील एनएसजी कमांडो यांनी केलेले शर्थीचे प्रयत्न महत्वाचे होते. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवान व नागरिकांच्या स्मृती जागवत सुरु केलेला हा उपक्रम स्तुत्य असून, या कार्यक्रमाची व्याप्ती अशीच वाढो, अशा भावना नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी व्यक्त केल्या.
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने पत्रकार विजय जोशी यांनी सुरु केलेल्या सैनिक हो तुमच्यासाठी या देशभक्तीपर गितांच्या श्रध्दांजली कार्यक्रमात उमाप अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. नांदेड पोलीस दल आणि संवाद संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक निती सरकार, पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, ज्येष्ठ पत्रकार शंतनू डोईफोडे आदींची उपस्थिती होती.
उमाप यांनी आपल्या भाषणात २६/११ चा हल्ला हा आपल्या देशावर झालेला मोठा आघात होता. दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. महाराष्ट्र पोलीस दल, एनएसजी कमांडो यांनी तो हल्ला जीव धोक्यात घालून परतवून लावला. मात्र यात अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक शहीद झाले. त्या हल्ल्याची आठवण म्हणून सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन सातत्याने करणे हि बाब कौतूकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपल्या भाषणात या हल्ल्याची इत्यंभूत माहिती देवून सुरुवातीला महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकार्यांनी व नंतर एनएसजी कमांडो यांनी अत्यंत शर्थीने मेहनत घेवून हल्ला परतवून लावला. नव्यापिढीला या हल्ल्याची माहिती व्हावी यासाठी सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम सातत्याने आयोजित करुन नवी प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले, असे राऊत म्हणाले. सुरुवातीला दिपप्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कार्यक्रमाचे पार्श्वभूमी पत्रकार विजय जोशी यांनी समजावून सांगितली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनुराग पवळे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. यानंतर २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर देशभक्तीपर गितांच्या कार्यक्रमात कल्याणी देशपांडे, पुणे, श्रीरंग चिंतेवार, पौर्णिमा कांबळे, स्वराज राठोड, राहुल मोरे, शुभंम कांबळे यांनी नव्या व जुन्या देशभक्तीपर गितांच्या रचना सादर केल्या. मराठवाड्यातील गाजलेल्या वाद्यवृंद्यांनी संगीतसाथ केली.
कार्यक्रमाचे निवेदक छत्रपती संभाजीनगरचे सद्दाम शेख यांनी जोशपूर्ण केले. गुरुव्दारा बोर्डाचे माजी अधीक्षक स.रणजितसिंघ चिरागीया यांनी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच कारगील प्रकरणात सादर केलेली कविता व शायरी सर्वांना भावून गेली. नांदेड येथील सुप्रसिध्द शास्त्रीय नृत्यांगना ईशा राजू जैन आणि साक्षी राधेश्याम मनियार यांनी सादर केलेले वंदे मातरम या गाण्यावरचे नृत्य सर्वोत्कृष्ट होते. उद्घाटकीय सोहळ्याचे सूत्रसंचलन गझलकार बापू दासरी यांनी केले. थंडीच्या वेळेतही नांदेडच्या रसिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रख्यात कर सल्लागार अॅड. दिपक शर्मा, पत्रकार अनुराग पवळे, प्रकाश कांबळे, चारुदत्त चौधरी, प्रल्हाद लोहकरे, दिपक बार्हाळीकर, गंगाधर हाटकर, आनंद सावरकर, योगेश मुर्वेâवार आदींनी परिश्रम घेतले.