नविन नांदेड| जगभरातील चर्मकार समाजाचे आराध्य दैवत, महाराष्ट्रातील संत गुरु रोहिदास महाराज मंदिर प्रस्तावित ग्रामीण तिर्थक्षेत्र वर्ग ब बळीरामपूर नांदेड या 40 वर्षापूर्वीच्या मंदिराची महापूजा दरवर्षी माघ पौर्णिमेस जयंतीनिमित्ताने व पुढच्या वेळेस 12 फेब्रुवारी 2025 रोज बुधवार शासनाच्या पुढाकाराने एक विशेष बाब म्हणून मा. पालकमंत्री नांदेड, मतदार संघातील मा. आमदार यांच्या शुभहस्ते, मा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या उपस्थितीमध्ये ठेवण्याची व्यवस्था व्हावी असे निवेदन वेळोवेळी सन 2020 पासून करण्यात येत असताना राज्य शासनाचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना. श्री अजितदादा पवार यांनी सदरील निवेदनाची योग्य ती दखल घेऊन मा. जिल्हाधिकारी नांदेड यांना पुढील उचित कार्यवाहीस्तव कळविले असल्याचे मा. जिल्हाधिकारी नांदेड यांनी त्यांच्या स्वाक्षरीने त्यांच्या कार्यालयाचे पत्र क्रं. 2024/जिनिस/का-3/865 दि. 11.07.2024 अन्वये प्रस्तुत तिर्थक्षेत्राचे संस्थापक वामनराव मे. विष्णुपूरीकर यांना अवगत केले आहे.


शासनाने सदर प्रकरणी दखल घेतल्यामुळे चर्मकार समाज, ग्रामस्थ मंडळी व विश्वस्तांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना तिर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंती तिर्थदर्शन योजना शासन निर्णय क्रं. 2424/प्रक्र- 189/सामासु दि. 14.07.2024 रोजी अंमलबजावणीसाठी जाहीर केली असून सदर योजनेचे सनियंत्रण व आढावा घेण्यासाठी राज्यस्तरावर 17 लोकांची समिती गठीत करण्यात आली आहे व जिल्हास्तरावर 7 लोकांची समिती गठीत करण्यात आली आहे.


सदरील शासन निर्णयाद्वारे भारतातील 73 तिर्थक्षेत्रांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्र राज्याकडून महाराष्ट्रातील 66 तिर्थक्षेत्रांची ज्यात नांदेड जिल्ह्यातील 4 तिर्थक्षेत्रांची निवड करण्यात आली आहे. सदरील योजना शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून राबविण्यात येत असल्यामुळे संत गुरु रोहिदास महाराज प्रस्तावित ग्रामीण तिर्थक्षेत्र वर्ग ब बळीरामपूर ता.जि. नांदेड हे शुद्रातिशुद्रांचे तिर्थक्षेत्राचा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत समावेश करण्यात येऊन आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक न्याय देण्यात यावा अशी आग्रही मागणी शासनाकडे सदर तिर्थक्षेत्राचे संस्थापक सचिव वामनराव मे. विष्णुपूरीकर यांच्याकडून करण्यात आली आहे.




