कंधार, सचिन मोरे| कंधार शहर हे विकासापासून वंचित राहिले असून हे शहर ऐतिहासिक व पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे. या शहराला राज्यमार्गाला जोडण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असून यासंदर्भात काही दिवसापूर्वी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून शहरालगतचे चार मुख्य रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी गडकरी यांना साकडे घातले आहे. हा प्रश्न शंभर टक्के मार्गी लागेल असा मला दृढ विश्वास आहे. हे रस्ते जोडल्यानंतर शहराचा चेहरा मोहरा बदलणारच (The face of Kandahar city will change dramatically – MLA Pratap Patil Chikhlikar) असे प्रतिपादन लोहा कंधारचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.


कंधार शहरातील दर्गापुरा येथील आयुब मंजिल ते मोठी दर्गा पर्यंतचा सीसी रोड व बंद नाली बांधकाम व शिवाजीनगर येथील २८.७७ लक्ष रुपयाचे श्याम केंद्रे यांचे घर ते बालाजी केंद्रे यांच्या घरापर्यंत सीसी रोड व नाली बांधकाम या विकास कामाचा शुभारंभ ६ जुलै रोजी दुपारी दोन वाजता आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आला. या कार्यक्रमास स्वप्निल पाटील लुंगारे, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष दत्ता पाटील शिंदे, प्राचार्य किशनराव डफडे, माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जफारोद्दीन, ऋषी पाटील मोरे आंचोलीकर, बाळासाहेब पवार, मधुकर पाटील डांगे, राजकुमार केकाटे, माजी नगरसेवक बालाजी पवार, व्यंकट मामडे, शेख मन्नू, मझर शेठ, शेख आसेफ, समीर चाऊस, मुजीब शेठ, उत्तमराव पाटील जाधव, शिवाजी पाटील लुंगारे, बालाप्रसाद मानसपुरे, चेतन केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी आमदार चिखलीकर यांच्या हस्ते विविध विकास कामाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार चिखलीकर म्हणाले की, मी एक सामान्य कार्यकर्ता असून गेल्या ४० वर्षापासून लोहा कंधार मतदारसंघांमध्ये सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन चालण्याचे काम मी केले आहे. मी कधीही जातिवाद केला नाही आणि भविष्यात देखील करणार नाही.



या निवडणुकीमध्ये मोठा जातिवाद झाला. माझ्यावर अनेक आरोप देखील झाले पण लोहा कंधार मतदारसंघातील जनतेवर माझा ठाम विश्वास होता जनता माझ्याच पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळेच एवढी मोठी लढाई मी जिंकू शकलो. या विधानसभा निवडणुकीचे खरे शिल्पकार तुम्हीच आहोत तुमच्या ऋणात मी कायम राहील. शहर विकासासाठी आजपर्यंत मोठ्या प्रमाणात निधी दिला असून आगामी काळात देखील शहराला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी दिली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश गोरे,व्यंकट नागलवाड,अमित मोरे, निळकंठ मोरे,बालाजी डफडे,बाळासाहेब गर्जे, व्यंकटराव तेलंग, प्रा. नामदेव राठोड, ज्ञानेश्वर कागणे, प्रा. माधव गीते, संग्राम मुंडे, ॲड.नरेंद्र राठोडकर,महेश मंगनाळे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शेख आसेफ यांनी केले तर आभार दत्तात्रेय एमेकर यांनी मांडले.

