नांदेड| दिवाळी संध्या २०२४ उपक्रमात जगद्विख्यांत गझलगायक, गझलनवाज भीमराव पांचाळे यांची मैफल बंदाघाट येथे संपन्न झाली. गोदावरीचा रम्य काठ, दिवाळीचा झगमगाट असलेला खुला रंगमंच, प्रेक्षकांनी खचाखच भरलेला बंदा घाट, भीमरावांच्या गझलेचे आर्त स्वर आणि निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांचे उत्साहवर्धक निवेदन असा आगळा वेगळा माहोल असलेल्या मैफलीने रसिकांची मने जिंकली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड वाघाळ मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गझलेचा हा सोहळा नांदेडकरांनी अनुभवला.
मैफलीची सुरुवात अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा, या इलाही जमादार यांच्या प्रसिध्द गझलेने झाली. माणसांचे विविध स्वभाव व त्याचा स्वतःशी होणारा संवाद या बाबी प्रकर्षाने भीमरावांच्या तलम रेशमी स्वरातून नमूद झाल्या. संगीता जोशी यांनी लिहिलेल्या, जीवनाला दान द्यावे लागते, या गझलेने खर्या जीवनातील वेदनेचा निचोड रसिकांसमोर पेश झाला.
नीता भीसे यांची, मी किनारे सरकतांना पाहिले. मी मला आदक्रंदतांना पाहिले ही गझल स्त्री जीवनातील सुख- दु:खाचा धांडोळा घेणारी ठरली. माधुरी चव्हाण जोशी यांच्या
करते थोडी स्वप्ने गोळा,
स्वप्नांचे वय कायम सोळा
सखे जरी तू सती पार्वती
हरेक शंकर नसतो भोळा
या बागेश्री पांचाळे हिने गायलेल्या गझलेने स्त्रीची कुचंबना व पुरुष जातीचा स्वभाव अधोरेखीत केला. फर्याद आजर यांची जावो शिशेका बदन लेक तर इलाही जमादार यांची एक ओळ मराठी व एक ओळ उर्दू असलेल्या ए सनम आँखोको मेरी खुबसुरत साज दे, येवूनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे, अशी व्दिभाषीक गझल भिमरावांनी सादर केली. स्वर्गीय सुरेश भट यांच्या
आसवांचे जरी हसे झाले,
हे तुला पाहीजे तसे झाले
पाहिले दुःख मी तुझे जेव्हा
दु:ख माझे लहानसे झाले’
ही गझल बागेश्रीने सादर केली.
रोशनीचे कायदे पाळायचे या खावर यांच्या गझलेने अख्या मानवी जीवनाचा आलेख मांडला. या सुरेख गझल मैफीलीचा समारोप ए.के.शेख यांच्या गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय, महागाईने पिचलेल्यांना होळी काय दिवाळी काय या सर्वसामान्य माणसाची व्यथा मांडणारी गझल भीमरावांनी सादर केली. या गझलेला रसिकांची प्रचंड दाद मिळाली. या मैफीलीचे खुमासदार निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी आपल्या खास शैलीतून विविध किस्से सांगत केले. तर त्यांना निवेदनात सुरेख साथ महाराष्ट्रातील ख्यातकीर्त गझलकार तथा अभिनेते किशोर बळी यांनी दिली. या मैफीलीत खास परभणीहुन आलेले उबाळे, सुरज कदम, निळकंठ पाचंगे, ख्यातकिर्त गायक अनिकेत सराफ यांची विशेष उपस्थिती होती. या मैफलीत साथ संगतीत तबला साथ डॉ. देवेंद्र यादव, हार्मोनियम साथ सुधाकर अंबुसकर, गिटार साथ संदीप कपूर, बासरीवादनाची साथ प्रशांत अग्निहोत्री यांनी केली.
मैफिलीच्या यशस्वीततेसाठी नांदेड वाघाळा शहर मनपाचे अपर आयुक्त गिरीष कदम, गुरुव्दारा बोर्ड व्यवस्थापक आर. डी. सिंग, नागरी संस्कृती समितीचे कार्याध्यक्ष बापू दासरी, डॉ. नंदकुमार मुलमुले, वसंत मैय्या, अँड. गजानन पिंपरखेडे, विजय बंडेवार, विजय होकर्णे, प्रा.सुनील नेरलकर, देविदास फुलारी उमाकांत जोशी, हर्षद शहा, लक्ष्मण संगेवार, पत्रकार विजय जोशी, पत्रकार चारुदत्त चौधरी, ज्येष्ठ पत्रकार शंतनू डोईफोडे, मकरंद दिवाकर आदींनीं परिश्रम घेतले.