नांदेड। मागील पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत राहून पुरस्कार सोहळ्यासह विविध उपक्रम राबवणारे दै. समीक्षाचे संपादक रुपेश पाडमुख यांना मुंबई येथील आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई मराठी ग्रंथ संग्रालय सुरेंद्र गावस्कर सभागृह, नायगाव, दादर (पूर्व) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.
नांदेड येथे मागील पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळापासून विविध वर्तमानपत्रात सेवा देत सतरा वर्षांपासून दै. समीक्षा वृत्तपत्र काढून अन्यायाविरुद्ध वाचा फोडत वंचितचा लढा देण्यासाठी पुढाकार घेण्याचे कार्य संपादक रुपेश पाडमुख हे सातत्याने करत आहेत. एवढ्यावरच न थांबता वृत्तपत्र क्षेत्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांसह वेगवेगळ्या क्षेत्रात सेवा देणार्यांना पुरस्कार देण्यासह शहिद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान, पोलीस दलातील उत्कृष्ट कार्य करणार्या अधिकारी, कर्मचार्यांचा सन्मान आणि विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणार्यांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा उपक्रम सतरा वर्षांपासून राबविण्यात येतो.
वृत्तपत्र क्षेत्रासहीत सामाजिक सेवेची दखल घेऊन मुंबई येथील पत्रकार संघ व सा. भगवे वादळ यांनी आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर केला आहे. मुंबईचा पुरस्कार पाडमुख यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांना सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.