नांदेड| पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ युवक महोत्सव दि. ४ ते ८ जानेवारी या कालावधीमध्ये गणपत विद्यापीठ मेहसाणा (गुजरात) येथे संपन्न होत आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ सहभागी होत असून एकूण २१ कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यासाठी विद्यार्थी कलावंत सज्ज झाले आहेत. विद्यार्थी कलावंत, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक असे मिळून ५० जणांचा संघ आज गणपत विद्यापीठ, मेहसाणा गुजरात कडे रवाना झालेला आहे.
इंद्रधनुष्य-२०२४ या आंतर्विद्यापीठ युवक महोत्सवामध्ये विद्यापीठाच्या संघाने चमकदार कामगिरी करून, नाट्य विभागाची चॅम्पियनशिप मिळवत विविध कला प्रकारात नैपुण्य मिळवले आहे. त्याच धर्तीवर पश्चिम विभागीय युवक महोत्सवामध्ये सुद्धा आपल्या विद्यापीठाचे विद्यार्थी आपल्या नैपुणाने चमकतील असा विश्वास व्यक्त करत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यापीठाच्या संघाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव उपस्थित होते.
विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम आदींनी उत्तम सादरीकरणासाठी संघाला भरभरून शुभेच्छा दिल्या. संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. संदीप काळे आणि संघ व्यवस्थापिका प्रा.माधुरी पाटील, प्रशिक्षक म्हणून. डॉ. शिवराज शिंदे, संदेश हटकर, दिलीप डोंबे, सिद्धार्थ नागठाणकर, डॉ. पांडुरंग पांचाळ, नवलाजी जाधव, संकेत गाडेकर हे संघासोबत आहेत. पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ युवक महोत्सवासाठी गेल्या वीस दिवसां पासून हे विद्यार्थी कलावंत प्रशिक्षण शिबिरामध्ये कसून सराव करत आहेत. या कामी विद्यार्थी विकास विभागाचे कर्मचारी संभा कांबळे, बालाजी शिंदे, जीवन बारसे परिश्रम घेत आहेत.
‘स्वारातीम’ विद्यापीठ मुलींचा संघ आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी रवाना
दि. ७ ते १४ जानेवारी या कालावधीत उदयपुर (राजस्थान) येथील मोहनलाल सुखाडिया विद्यापीठामध्ये पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मुलींचा संघ सहभागी होण्यासाठी रवाना होत आहे.
या संघामध्ये खेळाडू जानवी वीर, संतोषी हसाळे, मोहिनी खाडप, कस्तुरी पाटील, आकांक्षा भोसले, प्रतीक्षा तापसे, स्नेहा कालकुठे, ज्ञानेश्वरी हक्के, धनश्री पाटील, स्नेहा शिंदे, आकांक्षा कांबळे, प्रियंका भिसे, साक्षी खंदारे, साक्षी जाधव, पूजा कदम व लक्ष्मी बिरादार यांचा समावेश आहे. या सहभागी खेळाडूंना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी शुभेच्छा दिल्या. खेळाडू संघासोबत मार्गदर्शक म्हणून प्रा. ऋषिकेश, सहाय्यक मार्गदर्शक व व्यवस्थापक म्हणून डॉ. संतोष कोकीळ हे सहभागी होत आहेत.