नांदेड| माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. या उत्साहात आणखी भर घालत आज शनिवार दिनांक ४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता भव्य शंकरपट (बैलजोडी- बैलगाडा शर्यत) आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यसभेचे सदस्य खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे भूषवणार आहेत. तसेच आमदार जितेश अंतापुरकर, आमदार आनंदराव बोंढारकर व आमदार बालाजीराव कल्याणकर यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.
बैलगाडा शर्यतींनी महाराष्ट्रात नेहमीच मोठ्या उत्साहाला चालना दिली असून, यंदाच्या माळेगाव यात्रेत शंकरपट ही शेतकरी बांधवांसाठी खास पर्वणी ठरणार आहे. पारंपरिक बैलजोडींच्या स्पर्धा, वेगवान गाड्यांची चुरस तसेच ग्रामीण संस्कृतीचा ठसा अनुभवण्यासाठी या शर्यतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळेगाव ग्रामपंचायतीने विशेष प्रयत्न केले असून, शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.