माळेगाव यात्रा| माळेगाव यात्रेत जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित शैक्षणिक यात्रेत सर्वांचे आकर्षण ठरले आहे. या शैक्षणिक प्रदर्शनात विविध शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग, व पंचायत समिती लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणाधिकारी डॉ सविता तिडके शिक्षणाधिकारी सतिश व्यवहारे यांच्या मार्गदर्शनात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माळेगाव यात्रेत शैक्षणिक प्रदर्शनी स्टॉल उभारण्यात आला आहे. या प्रदर्शनात शाळा बाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारी बालरक्षक चळवळ या विषयाची संपूर्ण माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत.
सुंदर, आकर्षक ऐतिहासिक, सामाजिक संदेश देणारी आदर्श गाव मॉडेल्स, तसेच राज्य शासनाने सर्व शाळेतील इयत्ता- पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी आयोजित निष्ठा प्रशिक्षण, दीक्षा अॅप, अध्ययन निष्पत्ती, शिक्षण परिषद, बाल हक्क संरक्षण व हेल्पलाईन या विषयावर माहितीचे फलक, इंग्रजी विषयाचे सोप्या, आनंददायी पद्धतीने अध्ययन-अध्यापनाचे प्रात्यक्षिक उपलब्ध करून दिले आहे. मुलांना बालवयात कोणतेही व्यसन लागू नये, यासाठी तंबाखूमुक्त शाळा या अभियानाचे माहिती देणारे फलक लावण्यात आहेत. माळाकोळी जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोग, पर्यावरण, नैसर्गिक शेती, ग्रीन हाऊस, गणितीय संकल्पनेतून शहर व गार्डन व भूकंपापासून सतर्क राहण्यासाठीचा प्रयोग या ठिकाणी मांडण्यात आले.
विज्ञान शिक्षिका सविता रावसाहेब उमाटे यांच्या संकल्पनेमधून माळेगाव यात्रेत विज्ञान विषयक प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या शैक्षणिक प्रदर्शनात लोहा, माळाकोळी, आष्टुर, रिसनगाव शाळेतील शिक्षक तसेच विस्तार अधिकारी डी.पी. गुट्टे, एस.एल. नागरगोजे, आ. बी. राठोड, महेंद्र कांबळे, सुभाष पानपट्टे, मंगल सोनकांबळे, गंगाधर धुळगंडे, अशोक आढाव, रमेश राजापुरे, बाळू चव्हाण आदेश उपस्थित राहुन यात्रेकरूंना स्टॉल मधील माहिती देत आहेत.
माळेगाव यात्रेत ३४ वर्षांपासून सातत्याने शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी भरविणारे काकडे गुरूजी
मिशन मोडमध्ये एखादे काम सातत्य ठेऊन करणे अत्यंत जिकिरीचे असते .पण हे अवघड काम काकडे गुरूजी ३४ वर्षांपासून सातत्यपूर्ण करतात. प्रतिवर्षी माळेगाव यात्रेत वि.मा. काकडे हे सेवानिवृत्त शिक्षक शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी भरवतात. त्यांच्या प्रदर्शनीस यावर्षीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषदेच्या वतीने माळेगाव यात्रेत विविध स्टॉल्स लावले जातात.त्यापैकी शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी भरवली जाते.यात शिक्षण विभागाच्या विविध योजना, त्यांची अंमलबजावणी याची माहिती असलेले पोस्टर्स, फोल्डर्स , होर्डींग्स लावले जातात. मात्र यातील एक कोपरा आपले लक्ष वेधून घेतो.
लोहा तालुक्यातील वि.मा. काकडे गुरुजी हे सेवावृत्ती शिक्षक १९९० पासून सातत्याने स्वखर्चाने शैक्षणिक साहित्य तयार करून या यात्रेतील प्रदर्शनीत ते मांडतात. या शैक्षणिक साहित्यात भाषा, गणित, अध्ययन -अध्यापनाच्या पद्धती आणि विद्यार्थ्यांना सुलभ अध्ययन करता येईल या पद्धतीचे शैक्षणिक साहित्य मांडलेले असते. परिसरातील शिक्षक या प्रदर्शनीस भेट देतात. विद्यार्थीही भेट देतात आणि गुरुजींचा नवीन प्रयोग आवर्जून पाहतात. विद्यार्थ्यांसाठी क्वीज घेतात. त्यांना रोख पारितोषिके देतात.
गेली ३४ वर्ष सातत्याने कुठलाही खंड न पडू देता ते प्रदर्शनीत सहभागी होतात .या संदर्भात त्यांनी शिक्षण हे व्रत म्हणून मी स्वीकारले असून आयुष्यभर शिक्षण सेवा करणे हेच उद्दिष्ट ठेवले असल्याचे त्यांनी म्हटले. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे ,शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे आदींनी त्याचे कौतुक केले.