car hit the scooty hard : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या गाडीने स्कुटीला जोराची दिली धडक; स्कुटी चालकाचा मृत्यू तर महिला गंभीर

किनवट, परमेश्वर पेशवे| किनवटहुन इस्लापूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची गाडी क्रमांक एम एच 26 आर 457 या क्रमांकाच्या गाडीने स्कुटीला जोराची धडक दिल्याने स्कुटी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी झाल्याने इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.


या अपघाताची घटना नांदेड ते किनवट राष्ट्रीय महामार्गावरील हरीण खरबा जवळील खोल नाल्याजवळ ही घटना 10 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा ते एकच्या सुमारास घडली . प्रथमदर्शी बोधडी येथील विठ्ठल नागोराव बोईनवाड यांनी ही माहिती दिली.


सरिता रोहिदास राठोड व रोहिदास बळीराम राठोड हे हिमायतनगर तालुक्यातील रमणवाडी येथील रहिवासी असून हे दोघेही नातेवाईकाला भेटण्यासाठी रिठा या गावी जात असताना नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या गाडी क्रमांक एम एच 26 आर 457 या गाडीने समोरून स्कुटीला जोराची धडक दिल्याने रोहिदास बळीराम राठोड वय 42 वर्ष याच्या डोक्याला व उजव्या पायाला जबर मार लागल्याने याचा जागीच मृत्यू झाला तर सरिता रोहिदास राठोड वय 38 वर्ष ही महिलेच्या उजव्या हाताला जबर मार लागल्याने ही महिला गंभीर जखमी झाली.



सदरील या घटनेची माहिती इस्लापूर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांना मिळताच उमेश भोसले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे येऊन मृत पावलेल्या रोहिदास बळीराम राठोड याची पाहणी केली. व येथील वैद्यकीय अधिकारी खूपसे यांनी या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सरिता रोहिदास राठोड या महिलेला पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवले आहे अशी अधिकृत माहिती उपलब्ध होत आहे.

या अपघातात स्कुटीचा अक्षरशा चुरडा झाला असून या अपघातात मरण पावलेल्या रोहिदास बळीराम राठोड राहणार रमणवाडी व रिठा येथे शोककळा पसरली असून वृत्त लिहीपर्यंत गाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया इस्लापूर पोलिसात चालू होती. सदरील मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी खूपसे व त्यांची टीम इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात केले.



