किनवट, परमेश्वर पेशवे| सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावलींनी रेती, मुरुम, दगड चोरी विरुद्ध मोहीम उघडली असल्याने महसूल भरारी पथकाने दररोज शासनाच्या मालमत्तेची चोरी करणार्या टिपर, ट्रॅक्टर वाहाने धरण्यावर धडाका लावलाय. शनिवारी प्रशासनाला सुट्टी असल्याच्या संधीचा फायदा घेऊन प्रधानसांगवी येथिल ट्रॅक्टर बेंदी येथिल नाल्यातून रेती घेऊन जातांना महसूल पथकाने रंगेहात पकडले असून, किनवट तहसिल कार्यालयात लावले आहे. इस्लापूर, मारेगाव, शिवणी, मांडवी, सारखणी भागात गौणखनिजाची तस्करी चालू असतांनाही अद्यापतरी त्या परिसरात महसूल विभागाने कसलीही कारवाई केलेली नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली आणि तहसिलदार डाॅ.शारदा चोंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (७ डिसेंबर) दुपारी बेंदी येथे अवैध गौण खनिज (रेती) उत्खनन व विनापरवाना वाहतूक करत असतानाचे प्रधानसांगवीतील एक ट्रॅक्टर रंगेहात पकडून तहसिल कार्यालयात लावले आहे. सदरील पथकात ग्राम महसूल अधिकारी हरीश यादव, सचिन धुमाळे, विश्वास फड, यु. आर.जाधव, एस.एन. बोंतावर, विक्रम चौधरी,आदिनाथ डुकरे, सहाय्यक महसूल अधिकारी विजय सुरोषे, महसूल सेवक गजानन टारपे यांचा अंतर्भाव होता. धरुन आणलेल्या ट्रॅक्टर विरुद्ध कारवाई चालू असल्याचे सांगण्यात आले.
शनिवार आणि रविवार हे दोन दिवस तर महसूल कर्मचारीवृंद सुट्टीवर असल्याचे गृहीत धरुन रेती, मुरुम, दगड चोरांच्या टिपर व ट्रॅक्टरचा हैदोस पहायला मिळतो. रात्रभर चोरी केली जात असेल तर पोलीसांची रात्रीची गस्त असेल तर पोलीसांनी अशी चोरीची वाहाने धरायला हवीत. पण तशी त्यांनी कारवाई केलेली दिसत नाही. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी राज्यात अनेक ठिकाणी पुढे येऊन तस्करांविरुद्ध कारवाई केली असली तरीही किनवटात मात्र पोलीस यंत्रणा पुढे येतांना दिसत नाही. पोलीसांनीही धरपकड मोहीम राबवली तर महसूल पथकाला थोडीफार मदत होऊन त्या धंद्यांवर आवर घालता येईल अशी अनेकांची अपेक्षा आहे. आरटीओ यंत्रणा असून अडचण नसून खोळंबा म्हणल्यागत झाली आहे. त्यांनीही कधी दिवसा तर कधी रात्री फिरण्याची मोहीम उघडल्यास कित्येक वाहाने त्यांच्या कारवाईत अडकतील याचा नेम नाही.