Department of Education | बंडू आमदूरकर: शिक्षण विभागाचा आत्मा -NNL

नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर हे जिल्ह्या भरातातील शिक्षकांच्या मदतीला अडीअडचणी धावून जाणारे अधिकारी .ते 30जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत .शिक्षण विभागाचा ” आत्मा ” असे त्याचे संबोधन व्हायचे आणि ते अगदी बरोबर होय .त्याच्या कार्याचा थोडक्यात आढावा जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांनी घेतला आहे


एकदा बंडूला मी विचारलं, ‘खूप ताण येतो तेव्हा तुम्ही काय करता?’
‘काही नाही, कामांमध्ये स्वतःला व्यस्त करून घेतो’, तो उत्तरला.
मला नवलच वाटतं या माणसाचं. कायम, सतत कामात व्यस्त. या कामातूनही फोनवर उत्तरं देणार. डोक्यात हजारो कामांची जंत्री, तरीही आता कोणतं काम करायचं याचं प्राधान्य लक्षात राहणार. नाही हे उत्तर वरिष्ठांना कधीच नाही. सोपवलेलं काम बरहुकूम करणार. तेही अचूक, अपेक्षित, वेळेवर! जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागाचा कोणताही पुरस्कार समारंभ असो, त्याचे नियोजन बंडूकडे असणार. अगदी परफेक्ट! बारीक सारीक गोष्टींचे नियोजन आणि त्यानुसार अचूक आयोजन! सोबतीला तेवढाच जीवाला जीव देणारा फौज फाटा. म्हणेल तेव्हा, म्हणेल त्या वेळेला तात्काळ धावून येणारा.

कधीकधी मला कमाल वाटते बंडूची. एखाद्या शनिवार-रविवारी सुट्टी आहे म्हणून फोन केला, तर तो ऑफिसमध्ये असतो. पुढच्या कामाची तयारी चालू असते. बरे कार्यालयीन कामांमध्ये इतकं गुंतवून घेतानाही हा माणूस तितकाच कुटुंबवत्सलही आहे. लेकरांच्या कामाचं नियोजन, त्यांच्या अडीअडचणींची सोडवणूक, याबाबतही तितकीच तत्परता. या सगळ्या व्यस्ततेथून नातीसोबत आपल्या आनंदाचे क्षण व्यतीत करणारा जिव्हाळ आजोबाही मी पाहिला आहे.


मित्रांच्या संकटात, सुखदुःखात, अडीअडचणींत तितकाच आधार देणारा संकटमोचक मित्र म्हणूनही मी बंडूला अनुभवलेला आहे. धीर देणं काय असतं हे त्याच्याकडून शिकावं. आपल्याजवळ काहीच नसताना खूप काही आपल्याकडे चालून येईल हा आश्वासक आधार बंडू आपणाला देतो. नुसता आधारच देतो असं नाही, तर चहूकडून तो आधार भक्कम करण्यासाठी सगळं नकळत नियोजनही करत असतो. मात्र त्यांचं वैशिष्ट्य हे की तो हे आपणास अजिबात कळू देत नाही. नकळत आपल्या मित्रांसाठी तो हे करत असतो. असंख्य संदर्भात हा अनुभव मी घेतलेला आहे.

बऱ्याचदा असं वाटायचं की इतक्या सगळ्या फापट पसार्यात बंडू अरसिक होऊन गेलेला असेल. पण जेव्हा केव्हा साहित्याची, कलेची, राजकारणाची चर्चा मी त्यांच्यासोबत करतो, तेव्हा तेव्हा थक्क व्हावं अशी मतं त्याच्याकडून आपणाला ऐकायला मिळतात. त्याचं साहित्य, संगीत याच्याशी अभिजात नातं असावं अशा पद्धतीने तो बोलत राहतो. आपण थक्क होऊन जातो. या सगळ्या प्रशासनिक प्रपंचात हा माणूस हे असं वाचन कधी करत असेल याचेही आश्चर्य वाटतं.
कुटुंबातील प्रत्येकालाच आधार वाटावा इतपत बंडूचं झिजणं मी पाहिलेलं आहे. भले मग कुटुंबातला सदस्य मनासारखा वागत नसला तरी. मी माझ्या कुटुंबातल्या चिंता, काळज्या त्याच्यासमोर उघड्या करून ठेवत असतो. आणि त्यावर त्याच्याकडून रामबाण इलाजही घेत असतो. पण ती मात्रा काही मला लागू पडत नाही. आणि माझी चिंता काळजी काही संपत नाही.
कधी तणावात असलेलं मी बंडूला पाहिल्याचं मला आठवत नाही. कदाचित हेही या माणसाच्या जगण्याचं एक तंत्र असावं. आमचे चेहरे नाहीतर, आज काही थोडसं घडलं की लगेच जगाला उघडून उलगडून सांगत असतात. यांच्यात काय दडलंय काय चाललंय हे कधीच कुणाला कळत नाही. खरंतर याही गोष्टी आपण शिकून घ्यायला पाहिजेत. पण नाही, आजवर ते जमलं नाही. बंडूचा आणि वहिनींचा आमच्यावर खूप जीव आहे. माझ्या कुटुंबासाठी, लेकरा बाळांसाठी या दोघांनी जे केलंय त्याचा मी उतराई होऊ शकत नाही. काही काही व्यक्तींच्या प्रेमातून आपण कधीच उतराई होत नाही. होऊ शकत नाही. आणि होऊही नये. त्याबद्दल फक्त कृतज्ञ राहावं.
बंडूशिवाय शिक्षण विभाग ही गोष्टच अकल्पनीय आहे. सचोटीने कर्तव्यपालन करताना कैकांच्या नाराजीचा धनी झालेला हा माणूस कधी ताणतणावात मी पाहिलाच नाही. कायम काम काम आणि काम! सोपवलेली हरेक जबाबदारी नीटनेटकी पूर्ण करणं ही अफाट ताकद असणारा. भले मग कोणी काहीही म्हणो!
काहीजण तर गमतीने (की पोटदुखीने!) बंडूला चाणक्य म्हणत असतात. खरंय ते, एखाद्या निर्माणासाठी प्रतिबद्ध असणं म्हणजेच चाणक्य असणं. आजन्म सेविनिष्ठेला समर्पित राहणं सोपं नसतं. या वृत्तीला मग असंख्य जिव्हाळ्याचं गणगोत गवसतं. थोरामोठ्यांसह अगदी लहान सहान माणसांपर्यंत… कर्तव्याच्या महासागरात सतत फिरत राहणारं बंडू नावाचं जहाज आज निवृत्तीच्या किनाऱ्यावर आलंय… बंडोपंत, तुम्हाला निवृत्तीनंतरच्या निरामय आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा…
लेखक…व्यंकटेश चौधरी, नांदेड



