Bogus work of drains : हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील नाल्यांचे बोगस काम उघड..!
हिमायतनगर,अनिल मादसवार | हिमायतनगर शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी माली (नाल्या) बांधण्याचे काम सध्या सुरू असून, या कामात गंभीर अनियमितता व निकृष्ट दर्जा असल्याचे उघडकीस येत आहे. संबंधित ठेकेदाराकडून अंदाजपत्रकाला बगल देत मनमानी पद्धतीने काम केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.


नाल्यांचे काम करताना मध्यभागीपासून रस्त्याचे अंतर कुठे कमी तर कुठे अधिक ठेवले जात असून, कोणताही तांत्रिक मापदंड न पाळता काम उरकले जात आहे. ठिकठिकाणी थातूर-मातूर पद्धतीने मातीतच सिमेंट काँक्रीट टाकून काम पूर्ण केल्याचे चित्र दिसून येत आहे.


या कामात वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गजाची क्वालिटी अत्यंत कमी असून, आवश्यक असलेले क्युरिंगही करण्यात आलेले नाही. त्यामुळे या नाल्यांची मजबुती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पावसाळ्यात पाण्याचा पहिला जोर सहन करण्याची क्षमता या नाल्यांमध्ये आहे की नाही, याबाबत मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत.


या बोगस कामाविरोधात कोणी नागरिक आवाज उठविल्यास “आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही” अशा भाषेचा वापर ठेकेदाराकडून केला जात असल्याचा आरोपही स्थानिकांकडून होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


अभियंत्यांची मुकसंमती धोकादायक
सर्वात गंभीर बाब म्हणजे, संबंधित अभियंत्यांकडून या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष किंवा मुकसंमती दिली जात असल्याची चर्चा शहरात आहे. जर वेळेत या प्रकरणाची चौकशी झाली नाही, तर शहरातून जाणाऱ्या नाल्या पहिल्याच पावसात उध्वस्त होतील आणि मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हिमायतनगर शहरवासीयांकडून या संपूर्ण कामाची तांत्रिक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून, दर्जेदार व नियमबद्ध काम व्हावे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



