Police campaign intensified : पोलिसांची मोहीम आणखी तीव्र; पंधरवड्यात आणखी 973 कारवाया, अडीच कोटींहून अधिक रक्कमेचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड| नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, क्रिकेट बेटिंग, गुटखा, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, वाळू उपसा व वाहतूक अवैध प्रवासी वाहतूक इत्यादींना आळा घालण्यासाठी, पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी दिनांक 1 मे पासून, नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी अभियान सुरू केले आहे.


पोलिसांनी, मे महिन्यात राबविलेल्या अवैध व्यवसायविरोधी अभियान-1 दरम्यान, अवैध व्यवसायांत गुंतलेल्या 1721 इसमांचे विरुद्ध एकूण 1561 केसेस करून, 7,79,47,045/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता.


दिनांक 1 जून पासून, नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी अभियान-2 सुरू करण्यात आले असून, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पोलिसांनी 1059 आरोपींचे विरुद्ध एकूण 973 कारवाया करून 2,67,46, 571/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, अवैध व्यवसायांचे विरोधात सुरू केलेली मोहीम आणखी तीव्र केली आहे.


| अ.क्र. | जिल्हा | एकुण केसेस | आरोपी संख्या | जप्त मुद्येमाल |
| 1 | नांदेड | 224 | 242 | 27,45,747 |
| 2 | परभणी | 214 | 234 | 71,09,578 |
| 3 | हिंगोली | 284 | 294 | 54,09,422 |
| 4 | लातूर | 251 | 289 | 1,14,81,824 |
| एकूण | 973 | 1059 | 2,67,46,571 | |
उपरोक्त कारवाई दरम्यान, नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेने लोहा पोलीस ठाण्याचे हद्दीत गांजाची वाहतूक करताना दोन इसमांना पकडून त्यांचे कडून एकूण 14,13,500/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याचप्रमाणे, पोस्टे किल्लारी जि. लातूर यांनी 12,98,000/- रुपयांचा गुटखा जप्त करून चांगली कामगिरी केली आहे. सदर कामगिरी बाबत, पोलीस उपमहानिरीक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाच्या nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर कळवून अशा अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावा, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.



