
नांदेड,अनिल मादसवार| आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. दिनांक २० नोव्हेम्बरला मतदान होऊन २३ नोव्हेम्बरला मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून पक्षश्रेष्टींने दिलेल्या आदेशानुसार हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून विद्यमान आमदार जवळगावकर दावेदार असताना महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रभारी जिल्हाध्यक्षा डॉ. रेखाताई चव्हाण यांनीहि मतदार संघात जोरदार तयारी चालविली आहे. काँग्रेसमध्ये इच्छुकांच्या भाऊगर्दीतून अनेकांनी माघार घेतली असली तरी, आता आमदार जवळगावकर आणि डॉ.चव्हाण यांच्यातच उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु आहे. या दोघांच्या रस्सीखेचीत हदगाव विधानसभेची जागा उबठा गटाला सोडण्यात येऊन तिसऱ्याचा तर फायदा होणार नाही ना..! अशी चर्चा आता मतदार संघात होऊ लागली आहे. तर भाजपा, शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात देखील हादगावच्या जागेसाठी रस्सीखेच होऊ लागली असून, भाजपचे एक शिष्टमंडळ हि जागा मिळविण्यासाठी शर्तीचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. तर अजित पवार गट देखील हदगाव विधानसभेची जागा आम्हाला सोडा अशी मागणी करत आहेत. आतापर्यंत दोन वेळा दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविणारे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम यांनी देखील जोरदार तयारी चालविली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेने अद्याप पत्ते उघड केले नसल्यामुळे निवडणुकीच्या मैदानात कोण..? उभे राहतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणूका काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडी तर भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व इतर मित्र पक्ष महायुतीकडून एकत्र लढल्या गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनमत गेल्याने महाराष्ट्रात आघाडीला सुगीचे दिवस लोकसभा निवडणुकीत पहावयास मिळाले असून, महायुतीला मात्र उतरती कळा लागली असल्याचे चित्र राज्यात पहावयास मिळाले आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे व इतर मित्र पक्ष महाविकास आघाडी व तसेच भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट व अजित पवार राष्ट्रवादी गट अशी महायुती करून निवडणूका होणार आहेत. असे स्पष्ट असले तरी जागा वाटपाचा तिढा मात्र अद्याप सुटलेला नाही. जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आहे.

हदगाव आणि नांदेड उत्तर विधानसभेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु आहे. तर महायुती देखील हादगावच्या जागेसाठी आग्रही असून, बाबुराव कदम कोहळीकर हे गेल्या विधानसभा निवडणूकीत अपक्ष लाभूनही दुसर्या क्रमांकाची मते घेवून अल्पशा मतांनी त्यांचा पराभूत झाला होता. आत्तापर्यंत त्यांना दोन वेळा विधानसभा निवडणुकीत तर एक वेळा लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणीहि घटक पक्षाकडून केली जात असल्याने सध्यातरी उमेदवारीचे चित्र अस्पष्ठ आहे.


महाविकास आघाडीची काँग्रेस पक्षात उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच सुरू असून, जवळपास ११ उमेदवारांनी काँग्रेस पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे. हादगावच्या विद्यमान आमदाराला पक्षातल्याचं प्रभारी महिला जिल्हाध्यक्षांनी आव्हान दिल असून, महिला आरक्षण कोठ्यातून उमेदवारी मिळविण्यासाठी डॉ. रेखाताई चव्हाण मागील काही दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार…? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील काळात विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान केल्याचा सशंय नांदेड मधील काँग्रेसच्या तीन आमदारांवर होता. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून हदगावचे आमदार यांची ओळख आहे. त्यामुळे विद्यमान आमदाराचा ऐनवेळी पता कट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा हादगावची जागा ठाकरे गटाला सोडली जाऊ शकते…! अशी चर्चाहि सोशल मीडियावर होत असून, मशालींच्या उमेदवाराचा विजयी होईल अश्या प्रतिक्रिया देखील समाज माध्यमावर सुरु आहेत. असे झाले तर ते काँग्रेसला सोडचिठी देऊन विद्यमान आमदार इतर पक्षात प्रवेश करतील अशीही चर्चाही सध्याला सुरु आहे.




