Mla. Prataprao Patil Chikhlikar : स्काऊट-गाईडमधून शिस्त, स्वावलंबन व सहकार्याची जीवनमूल्ये मिळतात – प्रतापराव पाटील चिखलीकर

लोहा| स्काऊट-गाईड चळवळीतून विद्यार्थ्यांना शिस्त, स्वावलंबन व सहकार्य ही मूलभूत जीवनमूल्ये मिळतात. आजच्या काळात ही मूल्ये अधिक बळकट होण्याची गरज असून अधिक शाळा व अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग वाढायला हवा, असे मत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले.


लोहा-पारडी येथील सह्याद्री प्राथमिक व माध्यमिक शाळा मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय ५१ व्या स्काऊट-गाईड मेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १३) मोठ्या उत्साहात पार पडले. या मेळाव्यात ५१ शाळांचे ६० तंबू उभारण्यात आले असून जवळपास दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहा नगराध्यक्ष शरद पाटील पवार होते. व्यासपीठावर शिक्षणाधिकारी (प्रा.) वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी (मा.) माधव सलगर, राज्य प्रदेश सचिव अँड मुक्तेश्वर धोंडगे, युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, नायब तहसीलदार डॉ. हाडगे, शिक्षणाधिकारी (योजना) दिलीप बनसोडे, शा.पो.पु. अधीक्षक पाचगे, उपशिक्षणाधिकारी गंगाधर राठोड, उपनगराध्यक्ष करीम शेख, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, दत्ता वाले, नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, तालुका कृषी अधिकारी कासराळीकर, आयोजक संस्थापक सुदर्शन शिंदे, मुख्याध्यापिका जयश्री शिंदे, स्काऊट-गाईड संघटक जनार्दन इरले, जिल्हा गाईड संघटक माधुरी जवने, मेळावा प्रमुख सतीशकुमार वाकोडे, कब-बुलबुल मेळावा प्रमुख बालाजी तोरणेकर, प्रशिक्षण आयुक्त भागिरथी बच्चेवार, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.



मेळाव्यासाठी निधी वाढवण्याचे आश्वासन
उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार चिखलीकर म्हणाले, “हा जिल्हास्तरीय मेळावा आपल्या भागात होत असल्याने कोणतीही अडचण भासू दिली जाणार नाही. मेळाव्यासाठी निधी वाढून मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करू.” विद्यार्थी संचलन, ढोल-ताशांचा निनाद, तसेच सह्याद्री शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वागतगीत व नृत्य यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी जिल्ह्यातील स्काऊट-गाईडमध्ये शाळा व विद्यार्थी सहभागाची माहिती देत निधी उपलब्धतेसाठी आवश्यक उपाययोजना प्रास्ताविकात मांडल्या. प्रारंभी मान्यवरांचा सत्कार व मानवंदना संचलन झाले. सूत्रसंचालन प्रलोभ कुळकर्णी व बी.डी. जाधव यांनी केले, तर आभार गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी मानले. आमदार चिखलीकर यांनी विद्यार्थी तंबूंना भेट देऊन स्काऊट-गाईड व कब-बुलबुल विद्यार्थ्यांसोबत बराच वेळ संवाद साधला. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक संघटना, गटसाधन कार्यालय व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



