नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील जैवशास्त्र संकुलामध्ये विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून तसेच नौकरीकरिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहे.
जैवशास्त्र संकुलामध्ये चालणाऱ्या या कोर्समध्ये सर्टिफिकेट कोर्स इन प्रिन्सिपल्स अँड मेथडस इन ऑरनिथॉलॉजी, सर्टिफिकेट कोर्स इन मायक्रोस्कोपी अँड मेन्टेनन्स ऑफ मायक्रोस्कोप, सर्टिफिकेट कोर्स इन इक्विपमेंट्स अँड फोटोग्राफी ऑफ बर्ड्स, सर्टिफिकेट कोर्स इन बायोलॉजी-झूलॉजी म्युझियम मेंटेनन्स अँड मॅनेजमेंट व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सर्टिफिकेट कोर्स इन इंट्रोडक्शन टू ॲनिमल व्हायरसेस या प्रत्येकी तीन महिने कालावधीच्या पाच प्रमाणपत्र अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे संरक्षण व जैवविधता जतन करण्याबरोबरच स्वयंरोजगार व नौकरीकरिता उपयुक्त असे शिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रमाणपत्र प्रवेशासाठी शैक्षणिक अहर्ता बारावी विज्ञान बायोलॉजी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बीएस्सी पदवीधारक असल्यास जैवशास्त्रातील एखाद्या विषयासह पास असणे आवश्यक आहे. मायक्रोबायोलॉजी विभागात सुरू केलेल्या कोर्ससाठी बी.एस्सी. सूक्ष्मजीवशास्त्र किंवा बायोटेक्नॉलॉजी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या कोर्ससाठी प्रवेश घेताना कोणतेही मूळ प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता २५ आहे. प्रमाणपत्र अभ्यासक्रम फीस ४५००/- इतकी आहे.
एका विद्यार्थ्याला एका वेळी एकाच कोर्ससाठी प्रवेश मिळेल. एखादा विद्यार्थी इतर ठिकाणी प्रवेशित असेल तरी यापैकी कोणत्याही एका कोर्सला प्रवेश घेऊ शकतो. प्रत्येक कोर्स दोन क्रेडिट चा असल्याने त्याची अंतर्गत व बहिस्थ परीक्षा फक्त ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी जैवशास्त्र संकुलाच्या कार्यालाशी संपर्क साधावा. असे आवाहन संकुलाचे संचालक प्रा. डॉ. शिवाजी चव्हाण यांनी केले आहे.