नांदेड| अखिल भारतीय विद्यापीठ संघ आणि मेहसाणा (गुजरात) येथील गणपत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सतरंग’ हा आंतर राज्यस्तरीय पश्चिम विभागीय युवा महोत्सव दि. ०४ ते ०८ जानेवारी या कालावधीत नुकताच संपन्न झाला.

या महोत्सवात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ४० विद्यार्थी कलावंतांनी एकूण २१ कला प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. नृत्य, नाट्य, संगीत व ललित कला या प्रकारामध्ये विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला आदिवासी नृत्य, शास्त्रीय तालवाद्य, शास्त्रीय सुरवाद्य, मेहंदी व मिमिक्री या कला प्रकारात नैपुण्य मिळवत विद्यापीठाला पाच पारितोषिके मिळवून दिली आहेत. शिवराज मुधोळ (मेहंदी) द्वितीय, अर्जुन पवार (मिमिक्री) तृतीय, मुंजाजी शिंदे (शास्त्रीय तालवाद्य) चतुर्थ, चिन्मय मठपती (शास्त्रीय सुरवाद्य) चतुर्थ तर आदिवासी नृत्य या कलाप्रकारात चतुर्थ क्रमांक पटकाविला आहे.

मार्च २०२५ मध्ये संपन्न होणाऱ्या आगामी राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी अमेठी युनिव्हर्सिटी, नोएडा (दिल्ली) येथे विद्यापीठाचा संघ सहभागी होणार असून, मागील ‘इंद्रधनुष्य’ या राज्यस्तरीय युवा महोत्सवात विद्यापीठाच्या संघातील विद्यार्थी कलावंतांनी दमदार कामगिरी करून आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटवत नाट्य विभागाची चॅम्पियनशिप मिळवली होती. ही समृद्ध परंपरा पुढे ठेवत विद्यापीठाचा संघ राष्ट्रीय युवा महोत्सवात आपली नाममुद्रा उमटवेल. असा विश्वास व्यक्त करत कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी संघाचे अभिनंदन केले.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. डी. एन. मोरे, प्राचार्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, इंजी. नारायण चौधरी, डॉ. हनुमंत कंधारकर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, वित्त व लेखाधिकारी मोहम्मद शकील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग खडके, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. डी. एम. खंदारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, विषेश कार्यासन अधिकारी डॉ. दिगंबर नेटके, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.

संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. संदीप काळे व प्रा. माधुरी पाटील यांनी तर प्रशिक्षक म्हणून डॉ. शिवराज शिंदे, संदेश हटकर, सिद्धार्थ नागठाणकर, दिलीप डोंबे, नवलाजी जाधव, डॉ. पांडुरंग पांचाळ, संकेत गाडेकर कार्यालयीन कर्मचारी संभा कांबळे, बालाजी शिंदे, जीवन बारसे, रामराव पतंगे, शैलेश कांबळे यांनी संघासाठी अथक परिश्रम घेतले.