लोहा/नांदेड। मौजे जानापुरी ता.लोहा येथील मातंग समाजातील पवळे कुटुंबीय ऊसतोड कामगार म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करतात.
त्यांनी मुकादम आनंदा बाबुराव कळने रा.सरेगाव ता.मुदखेड यांच्याकडून उच्चल स्वरूपात काही रक्कम घेतली होती.ती रक्कम आत्ताच्याआताच परत करावी म्हणून ऊसतोड कामगार शिवाजी गणपत पवळे वय ५० रा.जानापुरी यास मुकादम आनंदा कळने याने ४ फेब्रुवारी रोजी बळजबरीने बोलेरो चारचाकी गाडीमध्ये टाकून अज्ञात स्थळी नेले होते.तसेच कामगारांची फायनान्सवर घेतलेली हिरो कंपनीची मोटार सायकल देखील बळजबरीने नेण्यात आली होती.


पीडित शिवाजी यास दांडक्याने, कोपराने व लाथा बुक्यानी चार जणांनी बेदम मारहाण केली असे स्वतः शिवाजी सांगत आहेत. कानावर जबर मारहाण केल्यामुळे कानातून रक्तस्तराव देखील झाला आहे. मुकादम कळने व इतर तिघेजन मुलगा गणेश पवळे यांच्या मोबाईल फोन वर फोन करून लाखो रुपयांची मागणी करीत होते. पैशाची व्यवस्था लवकरात लवकर व्हावी म्हणून पीडित किंचाळावा येवढी अमानुष मारहाण करीत होते हे त्रास सहन न झाल्याने शिवाजी पवळे यांची पत्नी सत्यभामा व दोन मुले गणेश व मनोज यांनी पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि सर्व हकीगत एस.पी.साहेबाना सांगितली.

पोलीस अधीक्षक यांनी सोनखेड पोलीस स्थानकात जाऊन अर्ज करण्यास सांगितले. परंतु सदरील ऊसतोड कामगार हे सोलापूर येथील साखर कारखान्यात कामावर असल्यामुळे त्यांना सोलापूर जाण्याचा सल्ला सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनखेड यांनी दिला. परंतु पोलीस अधीक्षक महोदयांनी आठविले असे त्यांना सांगितल्यावर लोकेशन तपासन्याचे काम सपोनि माने यांनी केले. आणि बारड पोलीस स्थानकाच्या हद्दीत संशयित असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही तेथे जाऊन पोलीस अधिकाऱ्यांना भेटावे असा सल्ला दिला.

निरक्षर असलेले पवळे कुटुंबीय हतबल झाले आणि त्यांनी समाजातील काही कार्यकर्त्यांचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. परंतु फारसा फायदा झाला नाही. सामाजिक कार्यकर्ते उत्तम गायकवाड आणि गणपत रेड्डी यांनी पीडितांना मदत केली आहे. शेवटी पीडितांनी सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांची मदत घेतली. कॉ.गायकवाड यांनी पोलीस अधीक्षक यांना व्हाट्सअप वर सर्व अचूक माहिती कळविली आणि १० मिनिटात चक्रे वेगाने फिरली.

पोलीस अधीक्षक महोदयांनी तात्काळ दखल घेतली व त्यांच्या सूचनेनुसार सोनखेड पो.स्टे.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने व इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक लोकेशन आधारे पीडित शिवाजी आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी निघाले. ही घटना ७ फेब्रुवारीची आहे. रात्रभर नातेवाईक देखील बारड, अर्धापूर येथे शोध घेत होते. सोनखेड पोलीस लोकेशन आधारे वर्धा पर्यंत पोहचले. शेवटी त्यांनी पीडित शिवाजी पवळे यांचा शोध घेतला आणि तीन आरोपीना अटक केली. चौथा आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाला होता. दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ४ वाजता सोनखेड पोलीस स्थानकात आरोपी विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले.
बहुधा आरोपी विरोधात वेगवेगळ्या दहा कलमा अंतर्गत पहिल्यांदाच गुन्हे दाखल कलम बीएनएस १७३ च्या अंतर्गत एफआयआर क्रमांक ३४ नुसार बीएनएस २०२३ कलम १३७ (२), १२७(३),३०९(४),३५१ (२), ३५१(३),११५(२),३(५), ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार ३(१)(r), ३(१)(s),३(२)(va) असे सोनखेड पो. स्टे. मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडिताची पत्नी सौ.सत्यभामा पवळे ह्या फिर्यादी असून अज्ञात इसमानी पुन्हा धमकी दिल्यामुळे पवळे कुटुंबीय भयभीत झालेले आहे. सोनखेड पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एक बोलेरो चार चाकी गाडी जप्त केली असून पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक हे करीत आहेत.
मायबाप एस.पी.साहेबांनी माझ्या भावाचे प्राण वाचविले, त्यांचे उपकार कधीही फेडता येणार नाहीत. अपहरण झालेले शिवाजी यांना सोनखेड पोलीस ठाण्यात पाहताच त्यांची बहीण धोंडूबाई पवळे यांनी हंबरडा फोडला.
आरोपीनी पीडितास येवढी अमानुष मारहाण केली होती की त्यास चालता येत नव्हते व बसताही येत नव्हते. पाठीवर,पायावर,हाथावर आणि कानावर माराचे वळ हिरवे निळे दिसत आहेत.
कमरेच्या खाली जबर मार दिल्याने सर्व भाग काळा पडला आहे. पीडितास चार दिवस जेवण दिले नाही किंबहुना पाणी मागल्यास मूत पाजण्याचा प्रयत्न आरोपीनी केला आहे असे शिवाजी यांनी सांगितले आहे. सद्या शिवाजी यास नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल, विष्णुपुरी येथे उपचार सुरु असून त्यांना कुणी बोलण्याचा प्रयत्न केला तर दचकून घाबरत आहेत.
बहीण धोंडूबाई यांना प्रतिक्रिया विचारली असता मायबाप एस.पी. साहेबांनी माझ्या भावाचे प्राण वाचविले आहेत, त्यांचे उपकार कधीही फेडता येणार नाहीत. म्हणून हंबरडा फोडला.
पीडित पवळे कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार,डिवायएसपी सुशीलकुमार नायक, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने व पोलीस विभागातील मदत केलेल्याने सर्वांचे आभार मानले आहेत.पीडित शिवाजी पवळे यांची प्रकृती सुधारत असून कार्यकर्ते व नातेवाईकांच्या जीवाला धोका आहे. अशी प्रतिक्रिया कॉ.सोनाजी कांबळे, रा.ढाकणी, पीडित शिवाजी पवळे यांचे साडभाऊ यांनी दिली.