लोहा l जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहावीत, त्याचबरोबर संवाद कौशल्य ,इंग्रजी भाषा, तंत्रज्ञान, आत्मविश्वास आणि कष्ट ही पंचसूत्री जीवनामध्ये अंगीकारावी, असे आवाहान यशदा पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांनी केले.
लोहा येथील ‘जिज्ञासा’ अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते .या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षा अभियानाचे सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे, नांदेड जिल्हा परिषदचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ. बबन जोगदंड यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मनन, चिंतन, लेखन,वाचन, सराव या गोष्टी कराव्यात .बोलण्याचे कौशल्य आत्मसात करावे व इंग्रजी भाषा समृद्ध करावी असे आवाहनही त्यांनी केले.
जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी अनेक संधी आहेत .जे कष्ट करतात, मेहनत करतात त्यांच्यासाठी आकाश ठेंगणे आहे असेही ते म्हणाले. यावेळी डॉ.विलास ढवळे यांनी स्पर्धा परीक्षा देताना सातत्यपूर्ण अभ्यास ठेवावा, त्याचबरोबर नियोजनपूर्वक जीवनाचे ध्येय विकसित करावे असे ते म्हणाले. मिलिंद व्यवहारे यांनी जीवनात चौकस राहुन चीकटीने यशाच्या दिशेने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
प्रारंभी प्रास्ताविकात जिज्ञासा अभ्यासिकेचे संस्थापक तथा पत्रकार हरिहर धुतमल यांनी या अभ्यासिकेच्यामार्फत अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देऊन नोकरीवर गेले आहेत असे सांगून ही अभ्यासिका सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणेतून सुरू केल्याचे सांगितले डॉ.बबन जोगदंड यांनी नुकतीच ‘लोकप्रशासन’ या विषयात दुसरी पीएचडी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा अभ्यासिकेच्यावतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक हरिहर धुतमल यांनी केले सूत्रसंचालन बालाजी धनसडे व आभार तनय धुतमल यांनी केले .पोलीस कर्मचारी कावळे, अन्नकाड़े, पवार ,वाकडे यासह कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.